scorecardresearch

मध्य प्रदेशमध्ये दुमजली इमारतीला भीषण आग; सात जणांचा जळून मृत्यू

या घटनेत पाच पुरुष आणि दोन महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Madhya Pradesh Fire breaks out in building in Indore seven die due to burning alive
(फोटो सौजन्य – ANI)

मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील स्वर्णबाग कॉलनीत एका घराला भीषण आग लागून सात जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. त्यावेळी या घरात राहणारे लोक गाढ झोपेत होते. बहुतेकांचा झोपेत गुदमरून मृत्यू झाला. या आगीत आठ जण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत पाच पुरुष आणि दोन महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीतील आगीमुळे निवासी इमारतीतून सात जणांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. तर ११ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. विजेच्या मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली आणि आधी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली, असे त्यांनी सांगितले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच विजय नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. आग आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला ३ तास ​​लागले, असे त्यांनी सांगितले. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेली ही इमारत इशाक पटेल यांचे घर असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच मरण पावलेले सर्व लोक भाडेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही लोक शिक्षण घेत होते तर काही नोकरी करायचे. आशिष, आकांक्षा, गौरव, नीतू सिसोदिया अशी मृतांची नावे आहेत तर २ जणांची ओळख पटलेली नाही. याशिवाय फिरोज, मुनिरा, विशाल, हर्षद आणि सोनाली अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. सध्या पोलीस अपघातातील मृतांची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केली दुःख

राज्याचे गृह आणि इंदौरचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पूर्णपणे सील केले. फॉरेन्सिक आणि इंटेलिजन्स अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. आमदार महेंद्र हरदिया आणि पोलिस आयुक्तांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Madhya pradesh fire breaks out in building in indore seven die due to burning alive abn