MP High Court rules Bhojshala complex is a temple: गेल्या काही महिन्यांपासून मध्य प्रदेशमधील वादग्रस्त भोजशाला-कमाल मौला मशीद परिसर चर्चेचा विषय ठरला होता. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर देशभरातील काही ठिकाणांचीही अशाच प्रकारे चर्चा वाढू लागली. त्यातच मध्य प्रदेशच्या धार भोजशाला-कमाल मौला मशीद परिसराचाही समावेश होता. या ठिकाणी आधी मंदिर होतं, असा दावा करण्यात आला. यासंदर्भात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सविस्तर खटलादेखील चालला. अखेर आज त्यासंदर्भात न्यायालयानं मोठा निकाल दिला असून तिथे मंदिरच होतं, असा निर्वाळा न्यायालयानं दिला आहे. देवी वागदेवी सरस्वतीचं मंदिर त्या ठिकाणी असल्याच्या दाव्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं असून तिथे हिंदू समुदायाला पूजेची परवानगी देण्यात आली आहे.
‘भोजशाला’बाबत न्यायालयाने काय म्हटलं?
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आपल्या निकालपत्रात न्यायालयाने या ठिकाणाबाबत सविस्तर टिप्पणी केली आहे. “ऐतिहासिक दस्तावेज आणि स्थापत्यशास्त्राचे संदर्भ पाहाता हे सिद्ध झालं आहे की वादग्रस्त परिसर हा परमार वंशाचे राजे भोज यांच्याशी संबंधित असून संस्कृत प्रशिक्षणाचं एक केंद्र होतं. त्या काळातील लेखी व स्थापत्यशैलीचे संदर्भ हे स्पष्ट करतात की त्या काळी धारमधील या ठिकाणी देवी सरस्वतीचे मंदिर होते”, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.
हिंदू समुदायाला धार भोजशाला येथे पूजेची परवानगी
दरम्यान, यावेळी न्यायालयाने हिंदू फ्रंट फॉर जस्टिसतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका मान्य करत ७ एप्रिल २००३ रोजी पुरातत्व खात्याच्या संचालकांनी दिलेले आदेश रद्द केले. या आदेशांनुसार, वादग्रस्त ठिकाणी हिंदू समुदायाला पूजेची परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच, मुस्लीम समुदायाला तिथे नमाज पठणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे आदेशच रद्द ठरवत भोजशाला परिसरात हिंदू समुदायाला पूजेची परवानगी देण्यात आली आहे.

धार भोजशाला वास्तूचं नियंत्रण पुरातत्व खात्याकडेच
दरम्यान, हिंदू समुदायाला या ठिकाणी पूजेची परवानगी देण्यात आली असली, तरी धार भोजशाला वास्तूचं नियंत्रण न्यायालयाने पुरातत्त्व खात्याकडेच ठेवलं आहे. भोजशाला आणि तेथील संस्कृत प्रशिक्षण केंद्रासंदर्भातलं व्यवस्थापन करण्याबाबत न्यायालयाने यावेळी केंद्र सरकार व केंद्रीय पुरातत्व विभागाला आदेश दिले. “या वास्तूचं जतन, संवर्धन व व्यवस्थापनाची पूर्णपणे जबाबदारी पुरातत्व खात्याकडे असेल”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
मंदिरातील सरस्वतीची मूर्ती इंग्लंडमधून परत आणणार?
मंदिरातील प्राचीन देवी सरस्वतीची मूर्ती सध्या ब्रिटनमधील एका संग्रहालयात आहे. ती मूर्ती तिथून परत आणून या ठिकाणी तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारलादेखील अनेकदा विनंतीपत्रे दिल्याची बाबही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात अधोरेखित केली. यासंदर्भात केंद्र सरकार या मागणीचा विचार करू शकते, असं न्यायालयाने नमूद केलं.

मुस्लीम समुदायाचे अधिकारही अबाधित ठेवणार
दरम्यान, एकीकडे हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देतानाच न्यायालयाने मुस्लीम समुदायाच्या अधिकारांचंदेखील उल्लंघन होणार नाही, याची खात्री करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. “जर याचिकाकर्ते वा मुस्लीम समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या संघटनेनं यासंदर्भात अर्ज दाखल केल्यास, त्याचा विचार करून धार जिल्ह्यातच मुस्लीम समुदायासाठी मशीद वा प्रार्थना स्थळ बांधण्यासाठी सुयोग्य अशी जमीन उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करू शकते”, असं न्यायालयाने निकालात स्पष्ट केलं.
तसेच, जर अशा प्रकारची जमीन देण्यात आली, तर ती कायद्याला धरून देण्यात यावी, शिवाय त्यात इतर सुविधा व व्यवस्थापनविषयक बाबींसाठीच्या जमिनीचादेखील समावेश करण्यात यावा, असंही न्यायालयाने सरकारला सांगितलं.
