पीटीआय, जबलपूर

मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात बार्गी धरणात क्रूझ बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊ झाली आहे. गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर चार मृतदेह सापडले होते. त्यानंतर आणखी पाच मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनाग्रस्त क्रूझ बोट राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून चालवली जाते. गुरुवारच्या घटनेमुळे सुरक्षेसंबंधी उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आतापर्यंत २८ पर्यटकांना वाचवण्यात यश आले असून सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथके बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बार्गी धरण हे नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यामध्ये नौकाविहार करण्यास पर्यटक पसंती देत असतात. मात्र, आता राज्यामध्ये क्रूझ बोटद्वारे नौकाविहारावर बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच, बुडालेल्यांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या स्थानिकांच्या शौर्याचा स्वातंत्र्यदिनी गौरव केला जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.