Bargi Dam Boat Accident Narmada Cruise Tragedy Reason: मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील बार्गी धरणात क्रूझ बोट दुर्घटनेत बुडल्यामुळे नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हसत-खेळत कौटुंबिक सहलीचा आनंद घेत असताना एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातानंतर एका आईचा कुशीत लहान मुलाला घेतल्याचा मृतदेह आढळून आला. हा फोटो पाहून हृदय पिळवटून निघाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. दरम्यान ही दुर्घटना कशी घडली? याबाबतची काही कारणे समोर आली आहेत.

राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत २८ पर्यटकांना वाचवण्यात यश आले असून सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. लष्करी तुकडी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथके बेपत्ता पर्यटकांचा शोध घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बार्गी धरण हे नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यामध्ये नौकाविहार करण्यास पर्यटक पसंती देत असतात.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, धरण परिसरात अचानक आलेले वादळ, क्रूझ बोटीच्या वरच्या डेकवर आणि खाली पर्यटक ये-जा करत असल्यामुळे गुरत्वाकर्षण केंद्रात झालेला बदल यांसारख्या घटनांच्या एकत्रित परिणामामुळे ही घटना घडली असावी.

jabalpur bargi dam boat tragedy death
नाव दुर्घटनेतील बळींची संख्या नऊ सहा बेपत्तांचा शोध सुरू; मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीचे आदेश

गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी जबलपूर शहराजवळ असलेल्या बार्गी धरण परिसरात सदर दुर्घटना घडली. जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ९० लोकांची क्षमता असलेल्या बोटीत केवळ ४० प्रवासी होते. बार्गी धरणाच्या जलाशयाचा आनंद लुटण्यासाठी सुरू झालेला प्रवास अपघातामुळे एका भयंकर शोकांतिकेत बदलला.

बोट बुडतानाचा धक्कादायक व्हिडीओ

शुक्रवारी (१ मे) बार्गी जलाशयातून ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. २८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, क्रूझ सुरू झाल्यानंतर अचानक जोरदार वादळ आले. वरच्या डेकवर मोकळी जागा असल्यामुळे अनेक पर्यटक त्या जागेत जमले होते.

“वरच्या डेकवर अनेक लोक गेल्यानंतर बोट डगमगू लागली. यात स्वतःचा तोल सावरण्यासाठी लोक इकडून तिकडे धावू लागले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हालचालीमुळे खालच्या भागात पाणी शिरले असावे. बोटीत पाणी भरल्यामुळे खालच्या डेकमध्ये आधीपासूनच असलेले किंवा नंतर खाली आलेले लोक फसले”, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

वरिष्ठ अधिकारी आणि बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या घटनांची मालिका आधीच सुरू झाली होती. हवामान विभागाने एक दिवस आधीच ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील असा इशारा दिला होता. या इशाऱ्याकडे कानाडोळा करत पर्यटन विभागाची क्रूझ सेवा सुरू होती.

खालच्या डेकमध्ये पाणी शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला

या दुर्घटनेनंतर सरकारने अनेकांवर कारवाई केली आहे. या क्रूझ बोटीचे चालक महेश पटेल, मदतनीस आणि तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे. बार्गी येथील शासनाच्या मैकल रिसॉर्ट आणि बोट क्लबचे व्यवस्थापक सुनील मरावी यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

बोट चालकाची प्रतिक्रिया समोर

बोटीचा चालक महेश पटेलची प्रतिक्रिया समोर आली आहे. बोटीत पाणी शिरल्यानंतर मी शक्य तितक्या प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असे सांगतान महेश पटेलने नऊ मृत्यू झाल्याबद्दल माफी मागितली.

महेश पटेलने ३० एप्रिल रोजीचा घटनाक्रमही उलगडून सांगितला. ते म्हणाले, आम्ही जेव्हा खमरिया बेटावरून बोट घेऊन निघालो, तेव्हा हवामान सामान्य होते. पण जलाशयाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर जोरात वारे सुरू झाले. आम्ही परत फिरावे आणि हवामान खराब असल्याचा कोणताही इशारा किंवा पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. वाऱ्याचा वेग तीव्र झाल्याने आणि लाटा बोटीवर आदळू लागल्याने आम्ही बोट किनाऱ्याकडे परत वळविण्याचा निर्णय घेतला.