रेवा: आपला थकलेला पगार मागितला म्हणून मालकाने ४५ वर्षांच्या मजुराचा हात छाटून टाकल्याची घटना मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्य़ात घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सिरमौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलमाऊ खेडय़ात शनिवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.पाड्री खेडय़ाचा रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीच्या अशोक साकेत याने डोलमाऊ खेडय़ातील गणेश मिश्रा याच्याकडे पूर्वी बांधकाम मजूर म्हणून काम केले होते. त्याचा थकीत असलेला पगार देण्यासाठी मिश्रा टाळाटाळ करत होता. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी साकेतने एका व्यक्तीसह शनिवारी मिश्राची भेट घेतली. मात्र या वेळी त्यांच्यात खडाजंगी होऊन मिश्राने तीक्ष्ण शस्त्राने साकेतवर हल्ला केला आणि त्याचा एक हात छाटून टाकला. छाटलेला हात जवळच लपवण्याचाही त्याने प्रयत्न केला, पण पोलिसांनी नंतर तो शोधून काढला. पोलिसांनी मजुराला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि तेथील डॉक्टरांच्या चमूने शस्त्रक्रिया करून त्याचा तुटलेला हात पुन्हा जोडला. मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्याने या मजुराची प्रकृती गंभीर आहे, असे सहायक पोलीस अधीक्षक शिवकुमार वर्मा यांनी सांगितले.