Madhya Pradesh Watermelon Death Case : मुंबईतील पायधूनी येथे काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असा दावा करणारी घटना समोर आली होती. मात्र, तपासाअंती त्यांचा मृत्यू कलिंगडमुळे झाला नसल्याचं स्पष्ट झालं. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील शेओपूर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांचा २१ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे. या दोघांनीही कलिंगड खाल्ला होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, कलिंगडमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी फेटाळून लावली आहे.
आजारपणात कलिंगड खाल्ला
इंद्रकुमार परिहार (वय ४३) असं मृत व्यक्तीचं नाव असून ते शाजापूर जिल्ह्याचे रहिवासी होते. शेओपूरमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. ते तिथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री इंद्रकुमार आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा विनोद यांची प्रकृती बिघडली. शुक्रवारी सकाळी दोघांनीही घरी कलिंगड खाल्ला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांची प्रकृती कमालीची खालावली. प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी पिता-पुत्राला तातडीने शेओपूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
इंद्रकुमार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोटा येथे पाठवले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. विनोदची प्रकृती अजूनही गंभीर आहे. इंद्रकुमार परिहार यांच्या पश्चात पत्नी संगीता, विनोद, राजा आणि देवा ही मुले आणि त्यांच्यासोबत राहणारी राधिका नावाची नातेवाईक असा परिवार आहे.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. आर. बी. गोयल यांनी सांगितले की, “दोन रुग्णांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांनी रात्री जेवणात भोपळा खाल्ला होता. नंतर रात्री त्यांची प्रकृती बिघडली. नातेवाईकांनी आम्हाला सांगितले की, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ले. त्या दोघांना छातीत आणि पोटात जळजळ जाणवत होती, त्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ले. पण त्यामुळे काहीच आराम मिळाला नाही. यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते आणि वाटेतच त्यांचे निधन झाले. आम्ही त्यांचे शवविच्छेदन केले आहे. अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. त्यांचा मुलगा, विनोद, रुग्णालयात दाखल असून व्हेंटिलेटरवर आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्राथमिक दृष्ट्या, हे कलिंगड खाल्ल्याचा परिणाम वाटत नाही, कारण त्यांना उलट्या किंवा जुलाबाची तक्रार नव्हती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ठसका लागत होता. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.”
डॉक्टर सध्या वैद्यकीय तपासणी करत असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे फळांमध्ये विषारी पदार्थ किंवा रसायने असण्याच्या शक्यतेवर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शवविच्छेदन (Postmortem) अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
