Pregnant woman gives birth in auto, All four newborns die: रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे मध्य प्रदेशच्या मांडला जिल्ह्यातील गर्भवती महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. यावेळी रिक्षातच महिलेची प्रसूती झाली. ज्यात तिने चार बाळांना जन्म दिला. मात्र जन्मानंतर लगेच या चारही बाळांचा मृत्यू झाला. सदर घटना बिछिया ब्लॉकमधील नायगनवा गावात घडली. महिलेच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय रजनी सिंगराम सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना तीव्र प्रसूती कळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे १०८ या रुग्णवाहिकेच्या हेल्पलाईनवर फोन लावून कुटुंबाने रुग्णवाहिकेला बोलावण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे त्यांनी खासगी रिक्षातून घुटस प्राथमिक आरोग्य केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला.

या केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर या महिलेला बिछियामधील सामुदायिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला गेला. दरम्यान, सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचण्यापूर्वीच रजनी यांनी रिक्षातच चार मुलांना जन्म दिला.

सामुदायिक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात येण्याआधीच चारही मुले दगावली होती. रजनी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. स्थानिक माध्यमांशी बोलत असताना रजनी म्हणाल्या की, आम्ही सकाळी ८ वाजता घर सोडले होते. चार बाळांपैकी तीन मुले आणि एक मुलगी होती.

रजनी यांचे पती धनेश म्हणाले की, माझी पत्नी सहा ते सात महिन्यांची गर्भवती होती. पण वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आम्हाला नाईलाजाने रिक्षातून रुग्णालयात जावे लागले. रस्त्यातच तिची प्रसूती झाल्यामुळे आमची चारही बालके दगावली.

Headstand During Pregnancy
नवव्या महिन्यात काही योगासने करणे कितपत सुरक्षित आहे. जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ… (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

बिछिया ब्लॉकचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप कुमार भारती म्हणाले की, महिला ३० आठवड्यांची गर्भवती होती. चारही बालके वेळेआधी जन्माला आली होती. नवजात बालके अविकसित आणि जन्मावेळी त्यांचे वजन खूपच कमी होते. रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांची प्रसूती झाली होती. रजनी यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

मांडला जिल्ह्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, चार मुलांचे वजन प्रत्येकी दीड किलो होते. वेळेपूर्वीच प्रसूती झाल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाने मात्र याचे खापर रुग्णवाहिकेवर फोडले. वेळेत रुग्णवाहिका मिळू शकली असती तर कदाचित चार मुलांचा जीव वाचू शकला असता, असे कुटुंबियांनी सांगितले.