Madhya Pradesh Morena Train Accident Update : मध्यप्रदेशातील मोरेना जिल्ह्यात उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. या गोंधळातून झालेल्या अपघातात दुसऱ्या एका ट्रेनच्या धडकेत चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागातील हेतमपूर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.
रेल्वे अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी डब्यात आग लागल्याची ओरड सुरू केली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी घाईघाईने रेल्वेतून उड्या मारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जनरल डब्यातील प्रवाशांनी अलार्म चेन (साखळी) खेचल्यामुळे ही ट्रेन हेतम्पूर आणि धोलपूर स्थानकादरम्यान थांबली. यादरम्यान रेल्वे रुळावर उतरलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका धडक बसल्याने त्यात किमान चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रत्यक्षात आग लागल्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे आढळले नसून, अफवेमुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका डब्यात मोबाईल चार्जिंग करत असलेल्या प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर कोणीतरी ट्रेनमध्ये आग लागल्याची ओरड केली आणि काही क्षणांतच संपूर्ण डब्यात भीतीचे वातावरण पसरले. घबराट इतकी वाढली की, काही प्रवाशांनी ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच खाली उड्या मारण्याचा प्रयत्नही केला. हा प्रकार लक्षात येताच एका व्यक्तीने जनरल डब्यातून अलार्म चेन खेचली. या ट्रेनमधील अनेक प्रवासी बागेश्वर धाम येथून दर्शन घेऊन कुटुंबासह परतत होते. ट्रेनमध्ये घबराट पसरल्याने प्रवाशांनी खाली उतरण्यासाठी एकच गर्दी केली. ट्रेनमध्ये राहण्यापेक्षा बाहेर पडणे अधिक सुरक्षित आहे, असे समजून अनेकजण शेजारील दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले.
दरम्यान, प्रवासी ट्रॅकवर उभे असतानाच काही वेळातच त्याच ट्रॅकवरून ‘फिरोजपूर-सिवनी पाताळकोट एक्सप्रेस’ अत्यंत वेगाने आली. ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांना काही समजण्याच्या आतच या सुसाट ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार प्रवासी जण जागीच ठार झाले, तर काहींना गंभीर दुखापत झाली. मोरेना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धर्मराज मीना यांनी सांगितले की, चेन खेचल्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली होती आणि घाबरलेले अनेक प्रवासी रेल्वे रुळावर उतरले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने आलेल्या दुसऱ्या एका ट्रेनने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, चारही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बचाव करीत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे संबंधित रेल्वे मार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली. बचावकार्य आणि रुळांवरील अडथळे दूर केल्यानंतर तसेच मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर दोन्ही रेल्वेगाड्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. या दुर्दैवी घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केली आहे. आग लागल्याची अफवा नेमकी कोणी आणि कशी पसरवली, तसेच प्रवासी ट्रेनमधून उतरून रुळांवर का गेले, याचा तपास केला जात आहे. याशिवाय या दुर्घटनेला कोणत्या त्रुटी कारणीभूत ठरल्या, याचाही शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात आहे.
