एका १८ वर्षांच्या तरुणीच्या गळ्यावर एक माथेफिरू तरुण चाकूने अनेक वार करत असताना आसपासची गर्दी फक्त बघत राहिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या नर्सिंगपूर जिल्हा रुग्णालयात २८ जून रोजी ही भीषण घटना घडली. रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये भर दिवसा सगळ्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. जवळपास दोन ते तीन मिनिटं हा तरुण मृत तरुणीच्या अंगावर बसून तिचा गळा चिरत असताना उपस्थितांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. काहींनी मोबाईलवर हा सगळा प्रकार शूट केला असून हे व्हिडीओच हल्लेखोराविरोधातील सबळ पुरावा मानले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार संध्या चौधरी असं या मुलीचं नाव असून ती नर्गिंगपूर जिल्हा रुग्णालयात नर्सिंगचं प्रशिक्षण घेत होती. २८ जून रोजी नियमित प्रशिक्षणासाठी संध्या रुग्णालयात आली असता अचानक तिथे अभिषेक कोष्टी नावाचा एक तरुण दाखल झाला. इमर्जन्सी युनिटमध्ये शिरताच अभिषेकनं संध्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. शेवटी संध्या खाली पडल्यावर अभिषेक तिच्या अंगावर बसला आणि तिच्या गळ्यावर चाकूने वार करू लागला.
धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं चालू असताना तिथल्या उपस्थितांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. भरदिवसा ऐन गर्दीच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपस्थित शेकडो लोकांपैकी कुणीही संध्याच्या बचावासाठी पुढे आलं नाही.
तरुणीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न?
दरम्यान, अभिषेकनं संध्याची हत्या केल्यानंतर तोच चाकू स्वत:च्या गळ्यावर फिरवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यात त्याला फारशी इजा झाली नाही. नंतर पुन्हा त्यानं संध्याच्या गळ्यावर चाकूचे वार केले आणि घटनास्थळावरून त्यानं पळ काढला. आपल्या कृत्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जात असल्याचं अभिषेकला माहिती होतं. त्यामुळे त्यानं फक्त आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं दाखवण्यासाठी स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा दावा काही उपस्थितांकडून केला जात आहे.
हत्येचं कारण प्रेमसंबंधांमध्ये तणाव?
दरम्यान, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या दोघांचे एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या तणावातूनच संतापाच्या भरात अभिषेकनं संध्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात संध्याचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संध्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येनंतर पोलिसांनी तातडीने हल्लेखोराचा तपास सुरू केला. नुकतीच अभिषेकला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.