Madhya Pradesh Crime News Wife Kills Husband: उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी घडलेले मुस्कान रस्तोगी आणि सोनम रघुवंशी प्रकरण चांगलेच गाजले. दोघींनीही आपल्या पतीला संपवून बनाव रचला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेशचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल इतके भीषण आहे. मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात प्रियांका पुरोहित नावाची महिला आपल्या पतीच्या रंगावरून सतत त्याला हिणवत होती. रील्स बनविण्याचा छंद असलेल्या प्रियांकाने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. वर चोरीचा बनाव करून अश्रूही ढाळले, पण तिचा बनाव पोलिसांनी उघड केला.
प्रकरण काय आहे?
७ एप्रिलच्या रात्री हा गुन्हा घडला. पुरोहित देवकृष्ण (वय २८) याचा मृतदेह त्याच्या घरात आढळला. त्याच्या डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आला होता. पत्नी प्रियांका पुरोहितने (वय २५) सांगितले की, काही चोर घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात लूट करत साडेतीन लाखांचा ऐवज लुटला. तसेच पतीला मारहाण करून पळ काढला.
सदर घटना नातेवाईकांना सांगत असतानाचा प्रियांका पुरोहितचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना सांगत असताना तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नसल्याचे दिसते. पण पोलिसांना तिच्या कथेवर विश्वास बसला नाही. त्यांनी उलटतपासणी केली असता प्रियांकाच या हत्येमागे सूत्रधार असल्याचे समोर आले.

देवकृष्णच्या कुटुंबियांनी सांगितले की, प्रियांका आणि देवकृष्णचे लग्न झाल्यापासून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. प्रियांका देवकृष्णच्या रंगावरून त्याला सतत हिणवत असे. ‘तू काळा आहेस, आपला जोडा शोभत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला असता’, असे टोमणे ती सतत मारत असे.
प्रियांकाला रील्स बनविण्याचाही छंद होता. त्यात तिचे एका कमलेश पुरोहित (वय ३२) नावाच्या पुरूषाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही देवकृष्णला बाजूला करण्यासाठी एक योजना आखली.
एक लाखांची सुपारी आणि चोरीचा बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश पुरोहितने देवकृष्णला मारण्यासाठी त्याचा सहकारी सुरेंद्र भाटीला सुपारी दिली. एक लाखांत देवकृष्णची हत्या करण्याचे ठरल्यानंतर ५० हजार रुपये आगाऊ देण्यात आले. हत्येच्या दिवशी प्रियांकाने जाणूनबुजून घराचा दरवाजा आतून खुला ठेवला. त्यानंतर सुरेंद्रने घरात शिरून झोपेत असलेल्या देवकृष्णवर वार केले.
#Watch: Woman seen crying on camera in MP’s Dhar, later arrested in husband’s murder case
— Jaag India (@thejaagindia) April 10, 2026
Police say she conspired with her lover; crime staged as robbery. Investigation ongoing.#JaagIndia #BreakingNews #MadhyaPradesh #Dhar #Crime #ViralVideo pic.twitter.com/OD40gJLgcJ
चोरीचा बनाव सिद्ध व्हावा यासाठी मग घरातील सामान विस्कटण्यात आले. तसेच घरातील मौल्यवान वस्तूही जाणूनबुजून लपवून ठेवल्या. प्रियांकाने स्वतःला पीडित असल्याचे सांगितले. चोरट्यांनी मला बांधून ठेवले आणि चोरीला विरोध करणाऱ्या देवकृष्णचा खून केला, असे सांगून प्रियांकाने सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
असा लागला छडा
पोलिसांना प्रियांकाच्या कथनावर सुरुवातीपासूनच संशय होता. तिने दागिने चोरीला गेले, असे सांगितले. मात्र घराची झडती घेतल्यानंतर ते घरातच सापडले. तसेच तांत्रिक तपास केल्यानंतर त्या रात्री प्रियांका आणि कमलेशचे सतत फोनवर बोलणे झाले असल्याचेही समोर आले. सर्व पुराव्यांसह प्रियांकाची कसून चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी प्रियांका आणि कमलेश पुरोहित या दोघांनाही अटक केली असून मुख्य आरोपी सुरेंद्र भाटी फरार आहे.
