Madhya Pradesh Shivpuri Health Centre : आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी आपण देशात भक्कम आरोग्य व्यवस्था उभारू शकलो नाही. याची अनेक उदाहरणं देशाच्या विविध भागात पाहायला मिळतात. असंच एक संताप निर्माण करणारं उदाहरण मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे. येथील एका ३२ वर्षी गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी अनेक फोन केले. मात्र, त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर तिच्या कुटुंबियांनी खासगी वाहनाने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र तिथे त्यांच्यासमोर नवं आव्हान उभं होतं. कारण आरोग्य केंद्रात ना डॉक्टर उपलब्ध होते ना परिचारिका.
राणी ओझा असं या महिलेचं नाव असून तिचे पती राम सेवक ओझा तिला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. हे दाम्पत्य शिवपुरी जिल्ह्यातील पहाडी गावातील रहिवासी आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून तिला प्रसूती वेदना होत होत्या. राम सेवक व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अनेक फोन करूनही त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. शेवटी ते स्वतःच एका खासगी वाहनातून आपल्या पत्नीला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले.
राणी ओझा यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यातं आलं. मात्र तिथे डॉक्टर व परिचारिका नव्हत्या. त्यावेळी ओझा यांची अवस्था इतकी बिकट होती की त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेणं शक्य नव्हतं. तातडीने प्रसूती करण्याची आवश्यकता होती. त्यावेळी आरोग्य केंद्रात एक स्वच्छता कर्मचारी होती, जी गर्भवती महिलेल्या प्रसूतीसाठी मदत करण्यासाठी पुढे आली. त्यानंतर काही मिनिटात तिची प्रसूती झाली, मात्र ते बाळ मरण पावलं.
मदत करणारी सफाई कर्मचारी निलंबित
शिवपुरीमधील खराई गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रिषीवार यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की त्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर परीक्षेला गेले होते, त्यामुळे ते आरोग्य केंद्रात उपस्थित नव्हते. तसेच त्या सफाई कामगाराला (जिने प्रसूतीसाठी मदत केली) कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.
नवजात कन्येचा जन्म, पण काही मिनिटांनी मृत्यू
राम सेवक ओझा म्हणाले, “मी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी कित्येक फोन केले. मात्र आम्हाला रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे मी एका खासगी वाहनाने माझ्या पत्नीला येथे घेऊन आलो. मात्र, येथे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी उपलब्ध नव्हते. माझ्या पत्नीची प्रसूती झाली, पण बाळाचा मृत्यू झाला. मी दुपारी १२.३० वाजता माझ्या पत्नीला घेऊन येथे (आरोग्य केंद्र) आलो. इथे डॉक्टर व परिचारिका नव्हत्या. त्यानंतर एक महिला आमच्याकडे आली व ती माझ्या पत्नीला लेबर रूममध्ये घेऊन गेली. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र जन्मानंतर काही मिनिटात बाळाचा मृत्यू झाला.”
हे ही वाचा >> …तर सीबीआय तपासासाठी तयार! डॉक्टर बलात्कार, हत्याप्रकरणी ममता बॅनर्जींची भूमिका; रुग्णालयांमध्ये निदर्शने सुरूच
“डॉक्टर व परिचारिका रविवारी आरोग्य केंद्रात येत नाहीत”
राणी यांना लेबर रूममध्ये घेऊन जाणारी महिला त्या आरोग्य केंद्रात सफाई कर्मचारी म्हमून काम करत होती हे राम सेवक यांना प्रसूतीनंतर समजलं. या महिलेने त्यांना सांगितलं की डॉक्टर व परिचारिका रविवारी आरोग्य केंद्रात येत नाहीत.