विश्व हिंदू परिषद आणि हिंदू मुन्ननी यांच्यात गणेश चतुथीच्या उत्सवावरून वरचढ ठरण्याची स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. विश्व हिंदू परिषदेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांनी हे निरीक्षण नोंदवले.

विश्व हिंदू परिषदेची मागणी काय?

बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, निलगिरी जिल्ह्यात पोलिसांनी ठरवून दिलेल्या तारखांऐवजी २० सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी विश्व हिंदू परिषदने मागितली होती. पोलिसांनी मात्र परिषदला १९ आणि २१ सप्टेंबर रोजी तर, पोलिसांनी हिंदू मुन्ननीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी २० सप्टेंबर ही तारीख ठरवली होती. दरम्यान, न्यायालयाने या तारका बदलण्यास आज स्पष्टपणे नकार दिला. एकाच विचाराचे असणारे विश्व हिंदू परिषद आणि हिंदू मुन्ननी अशा बाबींमध्ये एकमेकांशी समन्वय का साधू शकत नाहीत? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला.

न्यायालय काय म्हणाले?

“हे सगळे एकमेकांपेक्षा वरचढ ठरवण्याचे राजकारण आहे. हिंदू मुन्ननीपेक्षा अधिक शक्तिशाली विश्व हिंदू परिषद आहे, हे तुम्हाला दाखवायचे आहे”, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. “तुमचा विनायक हिंदीत बोलेल, त्यांचा विनायक तमिळमध्ये बोलेल, हाच एक फरक आहे. या सगळ्या गोष्टींवरून विनाकारण राजकारण करून पोलिसांना ताण देऊ नका,” असा सल्ला न्यायमूर्ती लक्ष्मीनारायणन यांनी दिल्याचे बार अँड बेंचच्या वृत्तात म्हटले आहे.

सरकारनेही मांडली भूमिका

दरम्यान, “विश्व हिंदू परिषद आणि हिंदू मुन्ननी यांच्या मिरवणुका एकाच वेळी आल्यास त्यांच्यात वाद झाल्यामुळे, त्यांना नेहमीच वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात”, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. तसेच, या वर्षी परिषदकडे विसर्जनासाठी २४ मूर्त्या आहेत तर हिंदू मुन्ननीकडे ७ मूर्त्या आहेत, असेही सरकारने सांगितले. हिंदू मुन्ननीला १ दिवसाच्या तुलनेत परिषदला मिरवणुकीसाठी २ दिवस दिल्याचे हे देखील एक कारण होते. “विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नदीची क्षमता देखील लक्षात घेणे आवश्यक आहे आणि सर्व मूर्ती एकाच वेळी विसर्जित करणे शक्य नाही”, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला.