न्यायव्यवस्थेविरोधात वादग्रस्त वक्तव्यं केल्याच्या गंभीर आरोपांवरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रवक्ते आणि पत्रकार सौरव दास यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या जनहित याचिकेची दखल घेत मद्रास उच्च न्यायालयानं सौरव दास यांच्यासह केंद्र सरकारच्या विविध प्राधिकरणांना नोटीस बजावली आहे.मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती जी. अरुल मुरुगन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

चेन्नईतील जमीन पल्लवरम येथील रहिवासी आर. गणेश कुमार यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याच्या मते, सौरभ दास यांनी भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायमूर्तींसह संपूर्ण न्यायव्यवस्थेबद्दल वारंवार आक्षेपार्ह आणि मानहानीकारक विधाने केली आहेत.

न्यायालयाचे निर्देश काय?

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करताना सौरव दास यांच्यावरील आरोपांवर अद्याप कोणतेही अंतिम मत किंवा निष्कर्ष व्यक्त केलेले नाहीत. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने सर्व प्रतिवादींना ६ आठवड्यांत आपले उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकेत कोणत्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत?

याचिकाकर्त्याने सौरव दास आणि त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीची सखोल आणि निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. सौरभ दास यांच्यासह पुदुचेरी येथे राहणाऱ्या त्यांच्या पालकांच्या पार्श्वभूमीची चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास दास यांचा पासपोर्ट आणि आधार कार्ड रद्द करण्याची कारवाई केली जावी. तसेच सौरव दास यांनी सोशल मीडियावरून न्यायव्यवस्थेची बदनामी करणारी विधाने करणे थांबवावे, यासाठी त्यांचे एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम खाते ब्लॉक करण्याचे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला द्यावेत.

प्रतिवादींमध्ये कोणाचा समावेश?

या याचिकेत केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण विभागांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यामध्ये चेन्नईचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, कायदे आणि न्याय मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच एक्स (X) आणि इन्स्टाग्रामच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कारवाई न झाल्याने कोर्टात धाव

याचिकाकर्त्याचे वकील बी. जगन्नाथ यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेण्यात आल्याने अखेर उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. “ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थेबद्दल विधान केले जात आहे, ती अत्यंत चुकीची पद्धत आहे,” असा युक्तिवादही वकिलांनी न्यायालयात केला. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता ६ आठवड्यांनंतर होणार असून, केंद्र सरकार आणि सौरभ दास न्यायालयीन नोटीसला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.