Madras High Court on Custodial Deaths : तमिळनाडूच्या शिवगंगई जिल्ह्यात एका मंदिरातील सुरक्षारक्षकाचा (२७ वर्षीय अजित कुमार) पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने स्वतःहून दाखल केलेल्या (सुमोटू) खटल्यावर मंगळवारी (१ जुलै) सुनावणी केली. न्यायमूर्ती एस. एम. सुब्रह्मण्यम व सी. व्ही. कार्तिकेयन यांच्या खंडपीठाने सोमवारी याप्रकरणी सुनावणी करताना पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच अनेक प्रश्न उपस्थित केले. पोलीस कोठडीत अशा प्रकारची वागणूक द्यायला तो काय दहशतवादी होता का? असा प्रश्न देखील उपस्थित केला.
न्यायमूर्ती म्हणाले, “अजित कुमारकडे कोणत्याही प्रकारची शस्त्रे नसताना त्याच्यावर हल्ला का केला. अशा प्रकरणात त्याला मारहाण का केली? तो काय दहशतवादी होता का?” अण्णाद्रमुक पक्षाच्या कायदेविषयक विभागाने मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी राज्यात गेल्या चार वर्षांत पोलीस कोठडीत २४ जणांचा मृत्यू झाल्याची यादी दिली आहे. यासह त्यांनी सरकारवर, पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर न्यायालयाने स्वतःहून यापैकी काही संशयास्पद प्रकरणांची दखल घेतली आहे. न्यायालयाने पोलीस प्रशासनाला या मृत्यूंबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे. यावर सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यामुळे हा खटला पुढे ढकलला होता.
सहा पोलीस निलंबित
दरम्यान, शिवगंगई जिल्हा पोलीस अधीक्षक आशिष रावत यांनी कोठडीतील मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपी असलेले पोलीस कर्मचारी रामचंद्रन, प्रभू, कन्नन, शंकर मणिकंदन, राजा व आनंद या सहा जणांना निलंबित करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवंगंगई जिल्ह्यातील तिरपुवनम येथील एका चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अजित कुमार याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. एका ४२ वर्षीय महिलेने आरोप केला होता की ती मदपुरम कालीअम्मन मंदिरात दर्शनासाठी गेली असता तिने मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या अजित कुमार याला कार पार्क करण्यास सांगितलं. त्यानंतर तिच्या कारमधील ८० ग्रॅम सोन्याचे दागिने गायब झाले. त्यानंतर या महिलेने अजितवर चोरीचा आरोप केला होता. मात्र, अजितने पोलिसांना सांगितलं की त्याला कार चालवता येत नसल्याने त्याने दुसऱ्या एका व्यक्तीची मदत घेतली होती. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अजित कुमारला सोडून दिलं होतं. मात्र, काही दिवसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी अजितच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती दिली. पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत अजितचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.
गुन्हा कबूल करण्यासाठी अजितसह कुटुंबालाही मारहाण
अजितने गुन्हा कबूल करावा यासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पोलिसांनी मारहाण केल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री तथा अण्णाद्रमुक पक्षाचे सरचिटणीस इडापड्डी पलानीस्वामी यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची, अजित कुमारच्या कुटुंबाला भरपाई देण्याची आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.