नेसले कंपनीच्या मॅगी नूडल्सच्या पुनरागमनाचा मार्ग सुकर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तीन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या चाचणीत ‘मॅगी’ आरोग्यासाठी हानिकारक नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळांनी दिल्याचे नेसले कंपनीने शुक्रवारी जाहीर केले आहे. मॅगीच्या सहा प्रकारांच्या एकूण ९० नमुन्यांची तीन प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात आली असून या नमुन्यांमध्ये शिस्याचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षाही कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात मॅगी खाण्यासाठी सुरक्षित असल्याचे मत प्रयोगशाळांनी नोंदवल्याचे नेसले कंपनीने आनंदाने जाहीर केले आहे. आता हे अहवाल न्यायालयात सादर करून ‘मॅगी’ची सुधारित आवृत्ती बाजारात दाखल करण्यास ‘नेसले इंडिया’ कंपनी सज्ज झाली आहे.

मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट(अजिनोमोटो) आणि शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे विविध चाचण्यांतून समोर आल्यानंतर देशात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नेसले कंपनीला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. मात्र, कंपनीने कायदेशीर लढा सुरू ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाने १३ ऑगस्टच्या निकालात मॅगीवरील बंदी उठवण्याचा आदेश देऊन कंपनीला किंचित दिलासा दिला होता व मॅगीचे नमुने प्रमाणित प्रयोगशाळात तपासण्यास सांगितले. त्यानुसार तीन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली.