Mahadev betting app kingpin Sourabh Chandrakar: बेकायदेशीर बेटिंगच्या माध्यमातून जवळपास ६ हजार कोटींचा गैरव्यवहार करणारा सौरभ चंद्रकर अखेर भारताच्या तावडीत सापडला आहे. महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बेटिंगचं रॅकेट चालवल्याचा आरोप सौरभ चंद्रकर व त्याचा साथीदार रवी उप्पलवर ठेवण्यात आला आहे. गेल्या ७ वर्षांपासून हे दोघेही सीबीआय, ईडी आणि इंटरपोलच्या मोस्ट वाँटेड यादीत होते. अखेर ओमानमध्ये त्याला अटक केल्यानंतर त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. खरंतर तो यूएईमध्ये असतानादेखील प्रत्यार्पणाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. पण आता ओमानमधून त्याला भारतात परत आणण्यात आलं आहे.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात CBI च्या प्रवक्त्यांनी रविवारी दिलेल्या सविस्तर निवेदनानुसार, सौरभ चंद्रकरला ओमानमधून भारताच्या ताब्यात देण्यात आलं आहे. “सौरभचा ताबा घेण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं एक पथक ओमानला पाठवण्यात आलं होतं. आता त्याला रायपूरमधील विशेष सीबीआय कोर्टात हजर केलं जाईल”, अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

सौरभ चंद्रकरला UAE मध्येही ताब्यात घेतलं होतं, पण…

दरम्यान, तिशीत असणाऱ्या सौरभ चंद्रकरला याआधी UAE मध्येही ताब्यात घेतलं होतं. पण तिथून त्याचं प्रत्यार्पण होऊ शकलं नव्हतं. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत महादेव बेटिंग अॅप सुरू केलं होतं. महादेव बेटिंगचा घोटाळा उघड झाल्यानंतर भारतातील ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी हे दोघे २०१९ च्या दरम्यान दुबईला पळून गेले.

त्यांच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर UAE पोलिसांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याला हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं होतं. त्याच महिन्यात भारताने सौरभ चंद्रकरच्या प्रत्यार्पणासाठी यूएईकडे विनंती प्रस्तावदेखील केला होता. मात्र, तेव्हा त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

Oman ला गेला अन् फसला!

याचदरम्यान, महादेव अॅपमधील सौरभ चंद्रकरचा साधीदार रवी उप्पल यूएईमधून फरार झाला. रवी यूएईमधून थेट ओमानमध्ये गेल्याचं नंतर उघड झालं. कालांतराने सौरभ चंद्रकरदेखील ओमानलाच फरार झाल्याचं स्पष्ट झालं. इंटरपोलनं सौरभ चंद्रकरला अटक करण्याची नोटीस काढली. सौरभ मस्कटमध्ये असल्याची माहिती ओमानच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला जून महिन्यात ताब्यात घेण्यात आलं. ओमानच्या पोलिसांनी मात्र भारताच्या प्रत्यार्पण प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली.

“सीबीआय व ईडीनं हे समजताच तातडीनं ओमानच्या प्रशासनाला सौरभ चंद्रकरच्या प्रत्यार्पणासाठी विनंती प्रस्ताव पाठवला. इंटरपोल नॅशनल सेंट्रल ब्युरो (NCB) व भारत सरकार यांच्यातील सहमतीने ओमान प्रशासनाने त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली आणि सौरभ चंद्रकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली. प्रत्यार्पण मंजूर होताच सीबीआयच्या पथकाने मस्कटमधून सौरभ चंद्रकरला ताब्यात घेऊन भारतात आणलं”, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.

रवी उप्पल अद्याप फरार

दरम्यान, महादेव बेटिंग अॅपमध्ये सौरभ चंद्रकरचा साथीदार असणारा रवी उप्पल अद्याप फरार आहे. ओमान पोलिसांना रवी उप्पलचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून त्याचा शोध घेतला जात आहे. त्याचंही भारताकडे प्रत्यार्पण केलं जावं, यासाठी सीबीआयनं ओमानकडे प्रस्ताव सादर केला आहे.

माजी मुख्मंत्री भूपेश बघेल आरोपींच्या यादीत!

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचंही नाव सीबीआयनं संशयित आरोपींच्या यादीत नमूद केलं आहे. याशिवाय, ईडीनं या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सौरभ चंद्रकर व रवी उप्पल यांनी भूपे बघेल यांना तब्बल ५०८ कोटींची लाच दिल्याचादेखील दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक राजकीय नेतेमंडळींची नावं उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.