scorecardresearch

Republic Day 2022 : राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला खास, गाण्याच्या ओळींपासून ‘त्या’ आवाजाबद्दल तुम्हाला माहितीये का?

या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश देण्यात आला.

आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वे वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले आहेत. यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आला होता. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले आहे. यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरली आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” आहेत. ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश आहे. सुमारे १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आली. या चित्ररथासाठी एक विशेष गाणेही तयार करण्यात आले होते. या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश देण्यात आला.

“वनराईचा राजा आंबा, ताम्हण आणि मस्त शेकरु
हरियालाचे रुप देखणे, निळे-जांभळे फुलपाखरु
अथांग सागर रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे
गवत फुलांच्या रंगावरती महाराष्ट्राचा जीव जडे
जपतो आम्ही जैववारसा, जपतो आम्ही वसुंधरा
झाडे लावू, झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा,” अशा या गाण्याच्या ओळी आहेत.

या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची आहे. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला आहे. नुकतंच सुदेश भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर भाष्य केले.

“महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून याबाबत विचारणा करण्यात आली. दरवर्षी आपण किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज यावर चित्ररथ करतो. यंदा आपण जैवविविधतेवर चित्ररथ करणार आहोत. पण थोड्या वेगळ्या अंदाजात हे करायचे आहे. यासाठी तुम्हाला फक्त ५० सेकंद आहेत. याला तुम्ही आवाज द्यायचा आहे. याचे स्क्रिप्ट आधी हिंदी होते. त्याला भारदस्त आवाज हवा होता. पण त्यावेळी सहजच अशी कल्पना सुचली की जर राज्य सरकारला पुढे कधीही हे गाणे वापरायचे असेल तर त्यासाठी मी माझ्याकडून मराठीत हे गाणे रेकॉर्ड करुन दिले,” अशी प्रतिक्रिया गायक सुदेश भोसले यांनी दिली.

पाहा व्हिडीओ :

“आधी हिंदीमध्ये रेकॉर्ड करुन ऐकवलं ते फायनल झालं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांनी या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. पण त्यानंतर मराठी ऐकवल्यानंतर ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे आहे, त्यामुळे त्यांनी मराठी गाणे निवडले. यात मी दोन तीन टेक घेतले आहेत. यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. संपूर्ण जग त्यावेळी डोळ्यासमोर ठेवून तो आवाज दिला,” असे सुदेश भोसले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra chitrarath on rajpath for 26th january republic day parade know everything about it nrp

ताज्या बातम्या