इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या कल्याणचा फहाद तन्वीर शेख या तरुणाचा रक्का येथील कारवाई दरम्यान मृत्यू झाला. फहादच्या कुटुंबियांना निनावी फोनद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

फहाद शेखच्या आईला मंगळवारी परदेशातील मोबाईल क्रमांकावरुन अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्या व्यक्तीने फहादचा सीरियातील रक्का येथे कारवाईदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली. हे ऐकून फहादच्या आईला धक्का बसला. त्यांनी फहादचा कुठे मृत्यू झाला याची माहितीदेखील घेतली नाही, असे फहादच्या नातेवाईकांनी सांगितले. फोन आल्यानंतर फहादच्या वडिलांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) या फोन कॉलविषयी माहिती दिली. एनआयएचे पथक हा फोन कुठून आला होता, याचा शोध घेत आहेत.

फहादचा मृत्यू झाला की नाही याची पडताळणी करणे सद्यस्थितीत कठीण आहे. रक्का येथे गेल्या आठवड्यात आयसिसचा पराभव झाला आहे. या भागातील हिंसक परिस्थिती पाहता शेखच्या मृत्यूची पडताळणी करणे कठीण आहे, असे सूत्रांनी सांगितले.

कल्याणमधील फहाद शेख, अमन तांडेल, सहिम तानकी, आरिफ मजीद हे चार तरुण २०१४ मध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी इराकला गेले होते. यातील अमन तांडेल आणि सहिम तानकी या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अारिफ माजिद हा तरुण भारातात परतला असून त्याला एनआयएने अटकही केली आहे.

अारिफ आणि फहाद शेख हे दोघेही चांगल्या घरातील असून दोघांचे पालक हे पेशाने डॉक्टर आहेत. या दोघांनीही घर सोडण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांना सापडली होती. आपल्याला या पापी लोकांच्या देशात म्हणजेच भारतात राहायचे नाही आणि अल्लाहची भूमी आम्हाला साद घालते आहे. तिथे गेल्यानंतर मृत्यू अटळ आहे, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला होता. हे चौघेही तरुण उच्चशिक्षित होते. बगदादमार्गे हे तरुण आयसिसमध्ये भरती झाले होते.