Eknath Shinde vs Shivsena : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर आता तर शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचं पत्र दिलं. तसेच गुवाहाटीतून आमदारांच्या पाठिंब्याचे फोटो, व्हिडीओ, पत्र जारी केले. यानंतर महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत शिंदे गटाला बहुमत गुवाहटीतून नाही, तर मुंबईत येऊन विधीमंडळात सिद्ध करावं लागेल, असं सांगत सूचक इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्सचा आढावा.
Maharashtra Political Crisis Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय संकट चौथ्या दिवशीही कायम, वाचा प्रत्येक अपडेट… | Read in English
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत स्पष्ट वक्तव्य केलं असून गद्दारांची अवलाद आपल्यात नको असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी
शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाहीये, शिवसेना हा एक विचार आहे. हा विचार भाजपा संपवायला निघाला आहे. त्यांचा हा डाव आहे. हिंदुत्वाच्या व्होट बँकेत त्यांना दुसरा भागीदार नको आहे. जो-जो हिंदुत्वाबाबत बोलेलं तो त्यांचा शत्रू आहे. जेव्हा भारतात भाजपा-शिवसेनेला कुणी विचारत नव्हतं, तेव्हा हिंदु मतांची विभागणी होऊ नये, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आज त्या युतीची फळं आपल्याला चाखायला मिळतायत, हे आपलं भाग्य आहे. – उद्धव ठाकरे
ही आपली लोक तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून निवडून दिलेली माणसं आहेत. यांची ओळख शिवसैनिकांमुळे आहे. माझ्यासमोर बसलेले अनेकजण त्यांच्या मतदार संघात निवडून येऊ शकले असते. पण आपण त्यांना उमेदवारी दिली. तुम्ही या लोकांना निवडून आणलं. तुमच्यापैकी अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होते, असाल. पण पक्षानं दिलेला आदेश पाळून, आपली इच्छा बाजूला ठेवून, तुम्ही पक्षानं दिलेला उमेदवार निवडून आणला, ही खरी निष्ठा, ही निष्ठा तुम्ही दाखवली. – उद्धव ठाकरे
तुम्ही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जात आहात, ते तुम्हाला दगा देतील असं काहींनी सांगितलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, त्यांच्या बाटलीवर तसं लेबल लावलं आहे. ते लेबल बघून आम्ही शंकराप्रमाणे विष प्राशन करत आहोत. बघुया काय होतंय. पण आज विशेष काय आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघंही आपल्या सोबत आहेत. सरकार असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं शरद पवार आणि सोनिया गांधींनी जाहीर केलं आहे. पण आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. – उद्धव ठाकरे
शिवसेनेसोबत कुणीच राहिलं नाही, असं चित्र रंगवलं जात आहे. पण तुम्हाला पाहून आनंद झाला. मी आता तुमच्या साथीनं महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. मी आधीच म्हटलं होतं, शिवसेना ही मर्दाची सेना आहे. आपल्यावर जेव्हा- जेव्हा कठीण प्रसंग आले. त्यावेळी ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं. त्या सर्व पोकळ आव्हानवीरांना आपण राजकारणात संपवून पुढे गेलो आहोत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी सांगितलं होतं की, आज परत सांगतो, शिवसेनेत गद्दारांची अवलाद नको. पण ती पुन्हा एकदा समोर आली आहे. – उद्धव ठाकरे
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच ऑनलाइन पद्धतीने नगरसेवकांशी संवाद साधला आहे. नगरसेवकांना बोलताना ते म्हणाले की, “लोकांना बंड करण्याची किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा आहे. पण त्यांनी कोणत्या वेळेचा फायदा उचलला? तर जेव्हा मुख्यमंत्री आजारी होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ते घराबाहेर पडू शकत नव्हते. त्या वेळेचा गैरफायदा त्यांनी स्वत:साठी घेतला. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आहे की, आम्ही कुणालाही थांबवणार नाही, ज्यांना जायचं आहे, त्यांनी जा, कारण मनाने तिथे आणि शरीराने येथे, अशी लोक आपल्याला नको. ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे. ज्यांच्या मनात शिवसेना आहे. हृदयात शिवसेना आहे, अशी लोक आपल्याला पाहिजेत. कारण तेच लोक आपल्या समाजासाठी काम करू शकतात आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात, आयपीएलप्रमाणे प्राइस टॅग लावलेली लोक आपल्याला नको आहेत. आपल्याला प्राइसलेस लोक हवी आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेली बैठक नुकतीच पार पडली आहे. मागील दोन तासांपासून ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. शरद पवार साडेसहा वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. ८ वाजून २० मिनिटांनी ते मातोश्रीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. सविस्तर बातमी
मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील हे देखील आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. सविस्तर बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक नुकतीच पार पडली आहे. मागील दोन तासांपासून त्यांच्यात चर्चा सुरू होती. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत देखील या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार साडेसहा वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. ८ वाजून २० मिनिटांनी ते मातोश्रीतून बाहेर पडले आहेत. बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री निवासस्थानावर दाखल झाले आहेत. यावेळी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं सांगत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
सध्या आसाम राज्यात मोठा पूर आला असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच मुद्द्यावरून आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून लवकरात लवकर गुवाहाटी सोडा, अशी विनंती केली आहे. सविस्तर बातमी
सांगलीचे शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार व पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अन्यायाला कंटाळून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी सांगली ग्रामीण भागातील पदाधिकारी ठाम उभे राहणार आहेत. आम्ही बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आमचा बंड पक्षाविरोधात नाही, तर राष्ट्रवादी विरोधात आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पालकमंत्री जयंत पाटील हे दुजाभाव करतात. शिवसेनेची गळचेपी करत आहेत. वारंवार आम्ही पक्षाला सांगितले आहे पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सेनेच्या अनेक नेत्यांना खुनाच्या खटल्यात अडकवले आहे. शिवसेनेला निधी दिला जात नाही. अशी अनेक कारणे आहेत. आम्ही शिवसेना सोडणार नाही. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी या अन्यायाच्या विरोधात आहेत, असं मत आनंदराव पवार यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार मातोश्रीवर दाखल, अजित पवार, जयंत पाटीलही उपस्थित, बंडखोरांविरोधात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष
थोड्याच वेळात पवार-ठाकरेंमध्ये मातोश्रीवर महत्त्वाची बैठक, शिवसेनेतील बंडखोरीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष, अजित पवारही उपस्थित राहणार
एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, “शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी भावपूर्ण प्रसंग सांगितला. आम्ही सर्व शिवसेनेतच, पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सर्वांनी समजून घ्यावं. संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य आहे.”
https://twitter.com/mieknathshinde/status/1540305087276339201
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक, कुर्लाचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड
प्रणिती शिंदे म्हणाल्या, “महाविकासआघाडी एकत्र आहे. आम्ही आघाडीसोबत आहोत. आम्ही ही लढाई १०० टक्के जिंकू. बहुमत कोणाकडे आहे, गटनेतेपद कोणाकडे आहे ही कायदेशीर लढाई आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बंडखोरांच्या अपात्रतेबाबत पत्र पाठवलं आहे. त्यानुसार विधानसभेचे उपाध्यक्ष बंडखोरांना अपात्र ठरवतील अशी आम्हाला आशा आहे.”
“काँग्रेस कधी संपणार नाही, कुणी संपवू शकणार नाही आणि कुणी तशी हिंमतही करणार नाही. आमचं अस्तित्व टिकून राहिलं. आम्ही गेम चेंजर ठरलो. आमचा पाठिंबा नसता तर महाविकासआघाडी नसती. आजही आमचा महाविकासआघाडीला पूर्ण पाठिंबा आहे,” असंही प्रणिती शिंदे यांनी मत व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंत चव्हाण सभागृह येथून मातोश्री निवासस्थानी रवाना झाले आहेत. आज सायंकाळी साडेसहा वाजता शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली जाणार असून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
“उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव, त्यांना आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार नाही”; अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांचं झिरवळ यांना पत्र, नरहरी झिरवळ विधानभवनात दाखल, बंडखोरांच्या आमदारकीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष
“निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे शिवसेना पक्षाची घटना आहे. त्याप्रमाणे कार्यकारणीच्या सदस्यांमार्फत प्रक्रिया करावी लागेल. विधिमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेच्या चिन्हासाठी ६ टक्के मतं मिळवावी लागतात. त्यामुळे विरोधकांना जोपर्यंत ४-६ टक्के मतं मिळत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्ह गोठवत नाही. त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर त्यांनी जावं,” असंही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केलं.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्यांना त्यांची आमदारकी वाचवायची असेल, तर कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल. तसं झालं नाही तर अपात्रतेतून सुटका मिळणार नाही. विलीन होताना नोंदणीकृत पक्षात विलिन व्हावं लागेल किंवा स्वतःचा गट काढावा लागेल. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे त्यांना भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल.”
अजित पवार म्हणाले, “मी महाराष्ट्रापुरतं बोलतो. देशातील इतर विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बोलतात. शरद पवार यांनी एखाद्या विषयावर काही वक्तव्य केल्यावर त्यावर बोलायची माझी लायकी नाही.”
अजित पवार म्हणाले, “आज सरकार बहुमतात आहे. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार निर्णय घेतले जात आहे. अनेक मंत्री मुंबईत आहेत आणि काम सुरू आहे.”
महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सविस्तर बातमी
मविआ अनैसर्गिक, शिवसेनेत बंड होणारच होतं, हे सरकार जवळपास पडलं आहे, धमक्या देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार, उदयनराजे भोसलेंचं शिवसेनेतील बंडखोरीवर वक्तव्य
बाहेरच्या भोडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचं काम करण्यात येतंय, हे सारं भाजपाने केलं, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल
मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं राक्षसी महत्त्वकांक्षा, एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, उद्धव ठाकरेंचा बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल
ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे याचा बंडखोरांवर घणाघाती हल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर हल्लाबोल, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले, काहींना मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोप, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत जिद्दीने पुन्हा पक्ष उभा करण्याचं आवाहन
सातारा : शिवसेनेतून बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारांचा पाठिंबा वाढत असला, तरी त्यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका आणि सातारा शहर येथील सर्व शिवसैनिक शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. सातारा शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे लावण्यात आलेले निनावी बॅनर लावण्यात आले. याच्याशी कोणत्याही सातारा शहर आणि तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संबंध नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. याबद्दलची अधिक माहिती सातारा शहर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब शिंदे उपशहर प्रमुख सचिन ढवळे, तालुका शिवसेनेचे उपप्रमुख प्रशांत नलवडे यांनी उद्धव ठाकरे यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे, अशा प्रतिक्रिया देखील माध्यमांशी बोलताना दिली.
नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या ट्वीट विरोधात नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्यावतीने शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात नागपुरातील व्हेरायटी चौक सिताबर्डी नागपूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. नारायण राणे यांच्या बॅनरला जोडे मारून आपला राग व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी यावेळी राणेंचा निषेध नोंदवला.
मुंबई – एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला “त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?” असा प्रश्न विचारला आहे. मुंबई मनपामध्ये मनसेचे ७ नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील ६ नगरसेवकांचा गट फोडला होता. आता शिवसेनेतून त्याच्या सहा पट आमदारांचा गट फुटल्याने मनसेतर्फे त्यांना 'जे पेरले ते उगवले' असा टोला लगावण्यात येत आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भाजपा विरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले. 'नको टरबुजा, नको खरबुजा', असे फलक घेऊन भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं.
बीड – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये लावण्यात आलेले बॅनर्स अखेर उतरविण्यात आले. बीड शहरातील शासकीय विश्रामगृह आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरमुळे कोणताही वाद घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. आम्ही भाई समर्थक असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला होता. विजयराज काटे या शिवसैनिकाने हे बॅनर्स लावले होते.
आदित्य ठाकरे बैठकीसाठी शिवसेना भवन येथे दाखल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार, शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार, शिवसेना भवनातील बैठकीकडे शिवसैनिकांचं लक्ष
मुंबई : ही आव्हानं द्यायची वेळ नाही, भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना टोला. आव्हान द्यायला पाहिजे, पण सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान द्यायची नाही, तर संवादाची वेळ आहे. आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे. मी तेव्हाही सांगितलं होतं की आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली? भास्कर जाधव यांचा सवाल?
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात होणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिल्याने आज कुडाळ तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले. पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत संदेश पारकर, सतीश सावंत उपस्थित होते. कुडाळ शिवसेना शाखेत स्वागत होताच कुडाळ काँग्रेसच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर भव्यदिव्य अशी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
आता वेळ निघून गेली आहे. जर रस्त्यावर लढाऊ झाली तर तिथेही आम्हीच जिंकू अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान दिलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असं आव्हान दिलं.
मुंबई : पोलीस आयुक्त संजय पांडे मातोश्रीवर, मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर रवाना, माध्यमांशी बोलणं टाळलं
मुंबई : संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून सांगतो. आम्ही जिंकणार आहोत. आम्ही हार मानणार नाही. ज्यांना सामना करायचं आहे त्यांनी मुंबईमध्ये यावं. त्यांची वेळ निघून गेली आहे. शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. गृहमंत्री यांना न्याय व्यवस्था चांगली माहित आहे. आम्ही सगळे जण संपर्कात आहोत. अल्टिमेटम संपला आहे.”
“साहेब, आम्ही तुमच्यासोबत, आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना”, ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून फेसबूक पोस्ट करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा
भाजपाचं राज्यपालांना पत्र, सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हस्तक्षेप करण्याची मागणी, महाविकासआघाडीवर २ दिवसांपासून अंदाधुंद निर्णय घेत असल्याचा आरोप, ४८ तासात १६० शासन निर्णय घेण्यात आले, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही घाट घातल्याचा आरोप, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून पत्र

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज (२४ जून) दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालिंदर बुधवत (बुलढाणा जिल्हा प्रमुख) शिवसेना भवनात येथे दाखल झाले आहेत.
संजय राऊत म्हणाले, “खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री आपण कृपया लक्ष द्या.”
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेबरोबर असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी गुवाहाटीमध्ये जाऊन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. कृषीमंत्री दादा भुसे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आणखी पाच आमदार शिंदे गटात गेले. यादरम्यान भास्कर जाधव कुठे आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र भास्कर जाधव हे चिपळूणमध्येच असून त्यांनी न्यूज १८ शी बोलताना यासंबंधी माहिती दिली.
महाराष्ट्रामधील केंद्रीय मंत्री शरद पवारांसारख्या व्यक्तीला धमकावत असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करतानाच नारायण राणेंनी शरद पवारांना धमकीवजा इशारा देताना ट्विटरवरुन केलेल्या ‘…तर घर गाठणे कठिण होईल’ वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.
https://twitter.com/deepalisayed/status/1540207167046688769
दीपाली सय्यद म्हणाल्या, “शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा. तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. आदित्य ठाकरे व श्रीकांत शिंदे यांनी ही जबाबदारी घेऊन कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र!”
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राजकीय संकट निर्माण झालं असताना सर्वांच्या नजरा ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीकडे आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडलं आणि कुटुंबासह मातोश्रीवर परतले. यानंतर मातोश्रीवरील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मध्यरात्री निवासस्थानाबाहेर आले होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बड
महाराष्ट्रातील राजकीय संकट चौथ्या दिवशीही कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे.