गुवहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’ हे महाराष्ट्रातील राजकीय हलचालींच्या सध्या केंद्रस्थानी आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत याच पंचातारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. मुंबईपासून २७०० किलोमीटरवर असणाऱ्या या हॉटेलमधून सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात शिंदेंनी बंडखोर आमदारांची आघाडी उघडली आहे. गुवहाटीमधील याच बंडखोर आमदारांसंदर्भात आणि गुवहाटीच या बंडासाठी निवडण्यात आल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांसमोर एक उपरोधिक वक्तव्य केलं.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेच्या निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर २१ जून रोजी एकनाथ शिंदे हे मोजक्या आमदारांसोबत सुरतमध्ये दाखल झाले. तिथून दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ जून रोजी त्यांनी बंडखोर आमदारांसहीत आपला मुक्काम गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये हलवला असून तेव्हापासूनच हे हॉटेल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. २२ जूनपासून एक एक करत अनेक शिवसेना आमदार आणि नेते शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर याच हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. एकीकडे आसाममध्ये पुराने थैमान घातलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी पंचातारांकित हॉटेलची सोय याच राज्याच्या राजधानीत करुन देण्यात आल्याची टीका या बंडखोरांना विरोध करणाऱ्यांकडून केली जात आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंचा थेट राज ठाकरेंना फोन; ‘या’ विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा

अशातच रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवहाटीमध्ये ठाण मांडून बसल्यासंदर्भात शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी एक उपरोधिक वक्तव्य केलं अन् उपस्थित हसू लागले. “गुवाहाटीला जाऊन मला खूप वर्षे झाली. त्या शहराबद्दल लोकांना इतके आकर्षण का हे माहिती नाही,” असं शरद पवार गुवहाटीमध्ये शिवसेना आमदार ठाण मांडून असल्याच्यासंदर्भात बोलताना म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

संसदेतच नव्हे तर, संसदेच्या बाहेर देखील पक्षविरोधी कृती केल्यास, खासदाराविरोधात पक्ष कारवाई करू शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही पक्षविरोधी कृत्याबद्दल दोन खासदारांचे सदस्यत्व रद्द केले होते. इथेही बंडखोरांना पक्षादेश लागू होतो, पक्षादेशाविरोधात कृती केली म्हणून बंडखोरांना अपात्र ठरले जाऊ शकते, असा दावाही शरद पवारांनी यावेळी बोलताना केला.

नक्की वाचा >> ‘…असा आव आणू नका, याची किंमत भविष्यात भाजपाला चुकवावीच लागेल’; बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत शिवसेनेचा इशारा

शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले जावे, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्या आधारे बंडखोरांना नोटीस बजावण्यात आली असून सोमवापर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. त्यासंदर्भात पवारांनी भूमिका स्पष्ट केली. राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असून दोन्ही काँग्रेसचा अखेपर्यंत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पािठबा राहील, असे पवार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis sharad pawar on shivsena rebel stay in guwahati scsg
First published on: 27-06-2022 at 09:44 IST