राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान मिळाले आहे. क्रमवारीतील पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात राज्यातील १२ संस्था आणि विद्यापीठ गटात १३ संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीही क्रमवारीत महाराष्ट्राला द्वितीय स्थानच मिळाले होते.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही यादी गुरुवारी जाहीर केली. शैक्षणिक संस्थांमधील अध्ययन-अध्यापन, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या रोजगारसंधी, एकूण दृष्टिकोन आदी निकषांवरील संस्थांची कामगिरी विचारात घेऊन ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. सर्वसाधारण गटामध्ये आयआयटी मद्रास प्रथम स्थानी आहे, तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळूरु दुसऱ्या स्थानी आहे.

*   सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातील आयआयटी बॉम्बे (४), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (२५), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (३०), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (३४), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (५७), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (७३), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (७५), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (९२), मुंबई विद्यापीठ (९५), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (९७), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (९८) या संस्थांचा समावेश आहे.

*  विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट मुंबई (१४), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (१८), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (३४), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, पुणे (३४), डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे (४६), नरसी मूनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (५७), दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा (६१), भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे (६३), मुंबई विद्यापीठ (६५), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (६९), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई (७७), कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराड (९०) यांना स्थान मिळाले.

मुंबई विद्यापीठाला स्थान

राज्यातील आघाडीचे विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण गटातील स्थान दोन क्रमाकांनी घसरले आहे. विद्यापीठ गटात एका स्थानाने उंचावले आहे. गेल्या वर्षी पहिल्या शंभर संस्थांमध्ये सर्वसाधारण गटात स्थान न मिळालेल्या मुंबई विद्यापीठाला यंदा ९५ वे स्थान मिळाले आहे.

तमिळनाडूची यंदाही आघाडी

क्रमवारीमध्ये तामिळनाडू गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आघाडीवर आहे. तमिळनाडूच्या सर्वाधिक अठरा संस्थांचा समावेश आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राच्या बारा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी सात, केरळमधील सहा संस्थांचा समावेश आहे.

विद्याशाखानिहाय यादी

विद्याशाखानिहाय शिक्षण संस्थांचीही स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. त्यात महाविद्यालय गटात तीन, अभियांत्रिकीच्या १०, औषधनिर्माणशास्त्राच्या १८, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तीन, विधी अभ्यासक्रमाची एक, दंतवैद्यकीयच्या तीन संस्थांना स्थान मिळवता आले. तर वास्तुकला अभ्यासक्रमाच्या एकाही संस्थेला क्रमवारीत स्थान मिळाले नाही.