Republic Day 2023: भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता. या चित्ररथाला देशभरातून दुसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाले आहे. तर उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर महाराष्ट्राने नारी शक्ती व साडे तीन शक्तीपिठांचा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दाखविला होता. महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” ही संकल्पना सादर करण्यात आली होती. महाराष्ट्र हा संत, देवदेवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात ज्याप्रकारे अनेक समाजसुधारक होऊन गेली, तशीच महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा राहिली आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घेता आले होते.

कसा होता महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती होती. समोरच्या डाव्या व उजव्या भागास पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा होत्या. त्यामागे शक्तिपीठांची मंदिरे असून त्यात देवींच्या प्रतिमा. मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजविणाऱ्या भक्तांची मोठी प्रतिकृती. तर मधल्या जागेत लोककलाकार आराधी, पोतराज हे लोककला सादर करत होते. तर शेवटी मागच्या बाजूस नारी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा लावण्यात आली होती.

या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले. संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले. ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’, या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra tableu based on shaktipeeth and nari shakti gets second prize in best tableau category kvg
First published on: 30-01-2023 at 16:06 IST