ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर काही तासांतच तोडफोड; भारताकडून देण्यात आली होती भेट

पंतप्रधान मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही तासांनंतर ही घटना घडली.

Mahatma Gandhi statue vandalized Melbourne Australia pm morrison says disgraceful
(FB/JasonWood.updates/)

भारत सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या कांस्य पुतळ्याची मेलबर्नमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. या घटनेबद्दल भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात निराशा आहे. ‘द एज’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे महावाणिज्य दूत ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसमवेत रॉविल येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर काही तासांनंतर ही घटना घडली.

“अनादराची ही पातळी पाहणे लज्जास्पद आणि अत्यंत निराशाजनक आहे. या देशातील सांस्कृतिक स्मारकांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत. यासाठी जो कोणी जबाबदार आहे त्याने ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाचे मोठे अपमान केले आहे आणि त्यांना लाज वाटली पाहिजे,” असे मॉरिसन यांनी रविवारी म्हटले. हा पुतळा भारत सरकारने भेट म्हणून दिला होता.

एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ५:३० ते शनिवारी संध्याकाळी ५:३० दरम्यान अज्ञात गुन्हेगारांनी पुतळा तोडण्यासाठी पॉवर टूल्सचा वापर केला. पोलिसांनी सांगितले की, नॉक्स क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि साक्षीदारांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन करत आहेत. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, शहरातील भारतीय समुदायाने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ व्हिक्टोरियाचे अध्यक्ष सूर्य प्रकाश सोनी यांनी सांगितले की, “या प्रकरामुळे भारतीय समुदायाला खूप धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. मला समजत नाही की कोणी असे घृणास्पद कृत्य का करेल. रॉविल सेंटर हे व्हिक्टोरिया राज्यातील पहिले भारतीय समुदाय केंद्र असून ३० वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याची स्थापना करण्यात आली आहे.”

‘ऑस्ट्रेलिया इंडिया कम्युनिटी चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष वासन श्रीनिवासन म्हणाले की, “अनावरणानंतर २४ तासांच्या आत कोणीतरी पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला याचे दु:ख झाले आहे. व्हिक्टोरियामध्ये असे घडेल असे मला कधीच वाटले नव्हते.” श्रीनिवासन म्हणाले की, दिवसभर मुसळधार पावसामुळे पोलिसांना बोटांचे ठसे सापडले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahatma gandhi statue vandalized melbourne australia pm morrison says disgraceful abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या