Wrestlers Protest : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीगीरांनी आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीत भारतीय कुस्तीगीर बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू दोन दिवसांपूर्वी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी गेले होते. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई होत नसल्याने कुस्तीपटूंनी आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. या आंदोलनावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. फोगाट बहिणींचे म्हणजेच भारताच्या स्टार कुस्तीपटू गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांचे वडील महावीर फोगाट पहिल्यांदाच या आंदोलनावर बोलले आहेत.
माजी कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट म्हणाले, “मला आमच्या मुलींची अवस्था पाहवत नाहीये. मुली आता कुस्ती सोडून देतील असं वाटू लागलं आहे.” द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंह फोगाट म्हणाले, मला आता या मुलींची अवस्था पाहत नाहीये. मी माझं सगळं काही देऊन, संघर्ष करून या मुलींना पदक जिंकण्यालायक बनवलं होतं. परंतु आज त्यांची ही अवस्था मी पाहू शकत नाही.




महावीर फोगाट यांनी त्यांचं गाव बलालीमध्ये गुरुवारी ग्राम पंचायत बोलावली होती. यावेळी फोगाट यांनी गावातल्या पंचांशी चर्चा केली. यावेळी फोगाट म्हणाले, आपल्या देशातील जनता इंग्रजांप्रमाणे हे सरकार हटवेल. संपूर्ण देश एकजुटीने निर्णायक आंदोलन उभारणार आहे. खाप पंचायतीसह सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि देशातली जनता या आंदोलनाची साक्षीदार असेल.
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कुस्तीपटू मंगळवारी रात्री उत्तराखंडमधील हरिद्वार येथील गंगातीरी पोहचले होते. पण, शेतकरी नेत्यांनी मध्यस्ती केल्यानंतर कुस्तीपटूंनी आपला निर्णय मागे घेतला आहे. यावेळी शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला इशाराही दिला.
हे ही वाचा >> अंत्य संस्कारांची तयारी झाली, चितेला अग्नी देणार एवढ्यात मृत व्यक्ती जागी झाली अन्…
“हे सरकार आमचं साधं ऐकून घेत नाही. आरोपी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यास तयार नाही. मग आम्ही देशासाठी जिंकलेली पदकं काय कामाची? ही पदकं आम्ही गंगेत विसर्जित करण्यासाठी आलो आहोत,” असं कुस्तीपटूंनी सांगितलं होतं. परंतु शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला. परंतु त्यांनी आंदोलन आणखी तीव्र केलं आहे.