तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर पुन्हा अंडी फेकण्यात आली आहेत. मतदारसंघात गेल्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याचा आरोप मोइत्रांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओतून केला आहे. मोइत्रांनी या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या पूर्वीच्या संदर्भ देत भाष्य केले आहे.
महुआ मोइत्रांनी कारमध्येच एक व्हिडीओ चित्रीत केला आहे. या व्हिडीओत त्यांच्या अंगावर अंडी फेकण्यात आल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना मोइत्रांनी प्रितिक्रिया देखील दिली आहे. “मायलॉर्ड मी पश्चिम बंगाल पोलिसांनी माहिती देऊन माझ्या मतदारसंघात एका बैठकीसाठी आले होते. आणि भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीने (पोलिसांच्या) माझ्यावर अंडी फेकली. तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या झेलेल्या त्याप्रमाणे मी त्यांचा सामना केला”, असे मोइत्रांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
“मी मतदारसंघात आले होते आणि माझी बैठक सुरु होती. यावेळी भाजपाचे नवनियुक्त मंडल सभापती, पंचायत समिती सभापती असे सात ते आठ लोक बाहेर होते. माझ्याबरोबर पोलिस होते, त्यानंतर आणखी पोलिस कर्मचारी आले आणि मला कारमध्ये ढकलू लागले”, असे महुआ मोइत्रा व्हिडीओत म्हणाल्या. “माझ्यावर अंडी फेकण्यात आली. बंगालमध्ये पोलिसांच्या समोर अशा घटना घडत आहेत. ते भाजपाचे कार्यकर्ते होते”, असा आरोप मोइत्रांनी केला. तसेच, “न्यायमूर्ती दत्ता यांचे नाव घेत त्यांनी हो मी गोळ्यांप्रमाणे अंडी झेलत आहे”, असे वक्तव्यही केले.
महुआ मोइत्रांनी या घटनेशी निगडीत आणखी दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये त्यांच्यावर अंडी फेकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. “गोळा झालेले लोक सामान्य नागरिक नव्हे तर भाजपाचे कार्यकर्ते होते,” असाही आरोप त्यांनी केला.
“काही लोक हिंदू विद्रोही महुआ दूर हटो अशा घोषणा देत असून त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. पण अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल”, असेही महुआ मोइत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी चिथावणीखोर भाषणाच्या प्रकरणात पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी मोइत्रा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.
