TMC MP Mahua Moitra Egg Attack news updates: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर अज्ञात आंदोलकांनी अंड्यांची फेकाफेक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील एका हॉटेलमध्ये महुआ मोइत्रा या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

नेमकं काय घडलं?

कृष्णनगर मतदारसंघाच्या खासदार महुआ मोइत्रा बुधवारी कार्यकर्त्यांसह एका हॉटेलमध्ये चर्चा करत होत्या. त्याच वेळी हॉटेलबाहेर जमलेल्या एका जमावाने जोरदार घोषणाबाजी करत हॉटेलच्या दिशेने अंडी फेकण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पहिला व्हिडिओ: हा व्हिडिओ आंदोलनकर्त्यांच्या बाजूने बनवला गेला असून, यामध्ये काही महिला आणि पुरुष हॉटेलच्या दिशेने अंडी फेकत घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

दुसरा व्हिडिओ: हा व्हिडिओ स्वतः महुआ मोइत्रा यांनी हॉटेलच्या आतून शूट केला आहे. यामध्ये त्या कार्यकर्त्यांसोबत बसलेल्या असताना हॉटेलच्या काचेच्या खिडक्यांवर अंडी येऊन आदळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

भाजपावर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर मोइत्रा संतप्त

या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्त्यांचा हात असल्याचा थेट आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मात्र, भाजपकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. घटनेनंतर महुआ मोइत्रा यांनी एक व्हिडिओ जारी करत स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हॉटेलबाहेर गर्दी जमल्याची माहिती आधीच देऊनही पोलिसांनी कोणतीही सुरक्षा दिली नाही किंवा कारवाई केली नाही, असा दावा त्यांनी केला. “माझ्या कपड्यांवर अंड्याचे डाग आणि भाज्यांचे तुकडे उडाले आहेत. पोलीस तिथे हजर असूनही केवळ मूकप्रेक्षक बनून पाहत होते,” अशा शब्दांत मोइत्रा यांनी आपला संताप व्यक्त केला.