Mahua Moitra : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारूण पराभव झाला आणि त्यानंतर काही दिवसांतच तब्बल ५९ आमदार आणि २० खासदार फुटले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. असं असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार महुआ मोइत्रा यांनी एक मोठं वक्तव्य करत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची प्रशंसा केली आहे. महुआ मोइत्रा यांनी सुवेंदू अधिकारी यांची प्रशंसा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आता खासदार महुआ मोइत्रा या देखील ममता बॅनर्जी यांची साथ सोडणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत महुआ मोइत्रा यांनी हे भाष्य केलं आहे.
महुआ मोइत्रा काय म्हणाल्या?
“मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही जेव्हा टीएमसीमध्ये एकत्र काम करत होतो, तेव्हा सुवेंदू अधिकारी यांनी मला खूप पाठिंबा दिला होता”, असं महुआ मोइत्रा यांनी सांगितलं. यावेळी महुआ मोइत्रा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील एका कठीण काळात सुवेंदू अधिकारी यांनी आपल्याला कसा आधार दिला याची आठवण सांगितली.
“२०१४ च्या निवडणुकीत लोकसभेचं तिकीट नाकारलं गेलं होतं आणि त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हा २०१४ मध्ये मला लोकसभेचं तिकीट मिळणं अपेक्षित होतं. मात्र, मिळालं नाही, त्यामुळे मी रात्रभर रडले होते. त्यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी मला धीर दिला होता. तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले होते”, असं महुआ मोइत्रा यांनी सांगितलं आहे.
“जेव्हा मी पहिल्यांदा करीमपूरमधून निवडणूक लढवली होती, तेव्हा माझ्या प्रचारासाठी कोणीही आलं नव्हतं. पण तेव्हाही पहिली रॅली सुवेंदू अधिकारी यांनी घेतली होती. आजही तुम्ही त्या रॅलीचे फोटो पाहू शकता. मी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा माझ्या समर्थनासाठी कोणीही पुढे येत नव्हतं, पण अशा वेळी सुवेंदू अधिकारी माझ्या पहिल्या रॅलीला उपस्थित राहिले होते”, असं महुआ मोइत्रा यांनी सांगितलं आहे.
