Mahua Moitra calls Yogi Adityanath Bulldozer Buddhi over Netaji Subhash Chandra Bose quote misattribution : पश्चिम बंगालमधील एका सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक अत्यंत प्रसिद्ध असलेले वाक्य स्वामी विवेकानंद यांचे असल्याचे सांगितले. यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोइत्रा यांनी योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख ‘बुलडोझर बुद्धी’ असा केला आहे.
महुआ मोइत्रा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “हॅलो बुलडोझर बुद्धी योगी आदित्यनाथ, तुमची माहिती तपासून घ्या. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा’. स्वामी विवेकानंद असे म्हणाले नव्हते. कृपया फँटा प्यायला उत्तर प्रदेशात परत जा आणि बंगालला सोडून द्या. तुम्ही हास्यास्पद आहात’.”
तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये योगी आदित्यनाथ ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा’ हे वाक्य स्वामी विवेकानंदांचे असल्याचे सांगताना ऐकू येत आहेत. यावरून तृणमूलने भाजपावर टीका केली आहे. या चुकीतून भाजपाचे बंगालच्या इतिहासाबद्दलचे धक्कादायक अज्ञान आणि अनादर उघड झाल्याचे टीएमसीने म्हटले आहे.
“योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा बंगालच्या इतिहासाबाबत भाजपाचे धक्कादायक अज्ञान आणि अनादर उघड केला आहे. त्यांनी ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा’ हे अजरामर वाक्य स्वामी विवेकानंदांचे असल्याचे सांगितले. जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहे. दोघे पूर्णपणे वेगळे आदर्श आहेत. दोघांचा पूर्णपणे वेगवेगळा वारसा आहे. दोघेही बंगालचे सुपुत्र आहेत. एका व्यक्तीने एकाच वाक्यात या दोघांचा अपमान केला आहे,” असे टीएमसीच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“त्यांना स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील फरक सांगता येत नाही. एकाचे वाक्य दुसर्याचे म्हणून सांगतात, नेताजी म्हणत स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला हार घालतात. आणि तरीही हे लोक ‘सोनार बंगला’ घडवण्याचे स्वप्न पाहण्याचे धाडस करतात. त्यांच्या अज्ञानाची खोली ही फक्त त्यांच्या अहंकाराशी जुळणारी आहे,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका २३ एप्रिल आणि २९ एप्रिल अशा दोन टप्प्यांत होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला किमान १४८ जागांच्या बहुमताची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक प्रचाराने जोर पकडला असून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होताना पाहायला मिळत आहे.
