पीटीआय, नोएडा हाथरसमधील २ जुलै रोजीच्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीच्या नजफगढ भागातून हाथरस पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याला शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणात अटक केलेला आणखी संशयित संजू यादवलाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी मधुकर आणि इतर संशयितांची कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. चेंगराचेंगरी प्रकरणात अटक केलेल्या रामप्रकाश शाक्य याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. शाक्य आणि यादव यांना शनिवारी हाथरस येथून अटक करण्यात आली.