Mainpuri farmer woman 10 crore bank account balance update: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका गरीब शेतकरी महिलेच्या बँक खात्यात अचानक ९ कोटी ९९ लाख रुपये जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममध्ये शिल्लक तपासताना हा प्रकार उघडकीस आला. नशिबाचा खेळ की तांत्रिक चूक? या प्रश्नासह महिलेच्या प्रामाणिकपणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
नशीब कधी आणि कसं फळफळेल याचा काही नेम नाही. अशीच काहीशी प्रचिती उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यातील बिछवान परिसरातील एका शेतकरी कुटुंबाला आली आहे. देवगंज गावातील रहिवासी पारसभन बहेलिया यांची पत्नी रीटा यांच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
एटीएममधील ‘तो’ आकडा पाहून बसला धक्का
रीटा या आपल्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करतात. नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी त्या काही पैसे काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेल्या होत्या. मात्र, तिथून पैसे निघत नसल्याने त्यांनी आपली शिल्लक तपासली. तेव्हा स्क्रीनवर जो आकडा दिसला, तो पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या खात्यात तब्बल ९ कोटी ९९ लाख ४९ हजार ५८८ रुपये जमा असल्याचे दिसत होते.
महिलेचा प्रामाणिकपणा चर्चेत
खात्यात अचानक एवढी मोठी रक्कम जमा होऊनही रीटा यांनी लोभ दाखवला नाही. त्यांनी तातडीने आपल्या कुटुंबाला याची कल्पना दिली आणि परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत या पैशांना हात लावायचा नाही, असा ठाम निर्णय घेतला. त्यांनी या घटनेचे चित्रीकरणही केले असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बँकेचे काय म्हणणे आहे?
घटनेची माहिती मिळताच महिला आणि तिचे कुटुंबीय बँकेत पोहोचले, मात्र सुट्टीमुळे बँक बंद होती. बँक ऑफ इंडियाच्या करीमगंज शाखेचे व्यवस्थापक ऋषिकांत पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा तांत्रिक बिघाड किंवा व्यवहारातील त्रुटी असण्याची शक्यता वर्तवली आहे. “बँक पुन्हा सुरू झाल्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि ही समस्या सोडवली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
