Maithili Thakur Speech : बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून २५ वर्षीय मैथिली ठाकूर या सर्वात तरुण आमदार झाल्या. बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा मैथिली ठाकूर यांची झाली होती. दरम्यान, आता मैथिली ठाकूर यांचा बिहारच्या विधानसभेत देखील दबदबा पाहायला मिळत आहे.
आमदार मैथिली ठाकूर आणि बिहारच्या आरोग्यमंत्र्यांमध्ये एका जीर्ण झालेल्या रुग्णालयांच्या प्रश्नावरून जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मैथिली ठाकूर यांच्या प्रश्नांवर बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं. मात्र, त्या उत्तराने मैथिली ठाकूर यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे ‘मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने मी समाधानी नाही’, असं म्हणत मैथिली ठाकूर यांनी सभागृहात आपल्याच पक्षाच्या सरकारला सुनावलं आहे.
बिहार विधानसभेत काय घडलं?
आमदार मैथिली ठाकूर यांनी म्हटलं की, “मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने मी पूर्णपणे समाधानी नाही. त्या लेखी उत्तरात म्हटलं की रुग्णालयाची इमारत वाईट स्थितीत नाही. तिला फक्त दुरुस्तीची आवश्यकता आहे. पण मला मंत्र्यांकडून आणखी एक स्पष्टीकरण हवं आहे. कारण मी त्या इमारतीची अवस्था स्वतः पाहिलेली आहे. त्या रुग्णालयात आरोग्य सेवा एका लहान खोलीत चालवल्या जात आहेत. त्या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नाहीत. मात्र, याआधी त्याच रुग्णालयात दोन एमबीबीएस डॉक्टर होते. आता एकही एमबीबीएस डॉक्टर नाही”, असं आमदार मैथिली ठाकूर यांनी म्हटलं.
‘मी मंत्र्यांना प्रश्न विचारत नाहीये…’
आमदार मैथिली ठाकूर यांनी पुढे म्हटलं की, “मी मंत्र्यांना प्रश्न विचारत नाहीये. माझी त्यांना विनंती आहे, कारण मी खूप लहान असल्यापासून आरोग्यमंत्र्यांकडे मंत्री म्हणून पाहत आलेली आहे. मी त्यांना आरोग्य क्षेत्रात काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी जनतेच्या हितासाठी ही समस्या सोडवावी अशी माझी इच्छा आहे”, असं मैथिली ठाकूर यांनी म्हटलं आहे.

