India Vs Pakistan : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी एक मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रागवाल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून होणारा घुसखोरीचा कट जवानांनी उधळून लावला आहे. या कारवाईवेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेतलं आहे.
संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. घुसखोरीचा हा कट जवानांनी उधळून लावल्यानंतर सीमा सुरक्षा दल आणखी अलर्ट झालं असून बीएसएफच्या जवानांनी प्रागवाल सेक्टर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख अब्दुल खालिक अशी झाली असून तो मूळचा राजोरुई जिल्ह्यातील दारहल भागातील रहिवासी आहे. तसेच त्याचे जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अब्दुल खालिक २०२१ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेला होता. त्याच्याकडून रायफल, एक मॅगझिन आणि १० गोळ्या तसेच एक रिकामी ड्रम मॅगझिन जप्त करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बीएसएफला दोन दिवसांपूर्वी सीमेपलीकडे काही संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या. त्यानुसार बीएसएफच्या जवानांनी काटेरी तारांच्या कुंपणाजवळील दक्षता आणि गस्त वाढवली होती. आज अब्दुल खालिकने सीमा ओलांडताच सतर्क बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
बीएसएफचे उपमहानिरीक्षक विक्रम कुंवर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की, पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमावर्ती असलेल्या त्यांच्या भागात ७० पेक्षा अधिक दहशतवादी लाँच पॅड सक्रिय केले आहेत. दरम्यान, त्या पार्श्वभूमीवर जवान अलर्ट असून त्याचाच एक भाग म्हणून आज सुरक्षा दलाने घुसखोरीचा कट उधळून लावला आहे.
