Delhi Car blast : दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या प्रकरणात आता सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली स्फोटाच्या घटनेतील संशयीत आरोपी उमर नबीच्या एका कारचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. हरियाणा पोलिसांना लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार अखेर सापडली. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी कडक कारवाई करत आरोपी उमर नबीचे पुलवामा येथील निवासस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.
उमर नबीच्या पुलवामा येथील निवासस्थानावर शुक्रवारी सुरक्षा दलांनी कारवाई करत उद्ध्वस्त केलं आहे. तपासाचा भाग म्हणून हे घर उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
#WATCH | | Delhi terror blast case: The residence of Dr Umar Un Nabi, accused in the Red Fort blast, has been demolished in Pulwama, Jammu and Kashmir. pic.twitter.com/gqvm7iwPBe
— ANI (@ANI) November 14, 2025
दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रात्रभर छापे टाकून आरोपी उमरच्या कुटुंबातील तीन सदस्यांसह सहा जणांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उमरने काश्मीरमधील इतर दोन डॉक्टरांशी संपर्क ठेवला होता. ज्यांना त्यानंतर अटक करण्यात आली. त्या कारवाईत २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती.
दिल्लीत नेमकं काय घडलं होतं?
राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे हादरली. संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ एका ह्युंदाई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर तिथे मोठा आगीचा भडका उडाला. त्यामुळे या कारच्या आसपास उभ्या असलेल्या इतर काही वाहनांनादेखील आग लागली. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे ऐन संध्याकाळी या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच हा स्फोट झाल्यामुळे मोठी जीवितहानी झाली.
दिल्ली स्फोटावेळी कार चालवत असलेल्या उमर नबीची तुर्कियेला भेट
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर झालेल्या कार स्फोटाचा तपास वेगाने केला जात आहे. दरम्यान तपासकर्त्यांनुसार या हल्ल्या एका दहशतवादी नेटवर्कचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे, ज्यामध्ये तीन काश्मीरी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग देखील समोर आला आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गाडीचा लाल किल्ल्याच्या जवळ स्फोट झाला ती चालवत असलेला डॉ. उमर यू नबी याने अन्य दोन व्यक्तींबरोबर तुर्कियेला भेट दिली होती. उमर याने मुझफर अहमद राथेर (कदाचित डॉक्टर) आणि डॉक्टर मुझम्मिल शाकील यांच्याबरोबर तुर्कियेला भेट दिली होती. हे तिघे मार्च २०२२ रोजी तुर्कियेला गेले होते, आणि दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ हे तेथे राहिले होते. येथे ते कथितपणे १४ जणांना भेटले. या सर्वांची ओळख तपसाली जात आहे.
