अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जानेवारीतील आपल्या भारत भेटीदरम्यान पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेऊन दोन दिवसही उलटत नाहीत तोच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान हे अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांची तस्करी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे या देशाच्या अण्वस्त्रांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने ‘डोळस’पणे पाहण्याची गरज आहे, असा इशारा अमेरिकेतील एका विचारमंचाने दिला आहे. तसेच यासाठी अमेरिका आणि युरोपीय महासंघ यांनी संयुक्तपणे ठोस पावले उचलण्याची गरजही या संरक्षण अभ्यासकांनी दिली आहे.
‘अ ट्रान्सअटलांटिक पाकिस्तान पॉलिसी’ असे शीर्षक असलेला अहवाल अमेरिकेतील एक विचारमंच, जर्मन मार्शल फंड आणि स्वीडिश रिसर्च एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे. ध्रुव जयशंकर, अँड्रय़ू स्मॉल आणि डॅनियल ट्विनिंग या अभ्यासकांनी हा अहवाल तयार केला असून, सोमवारी तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची चोरी होण्याची, त्यांची विक्री होण्याची, ती हरविण्याची किंवा त्यांचा गैरवापर होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. असे झाल्यास त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला मोठा धोका आहे आणि म्हणूनच अमेरिका आणि युरोपीय महासंघाने एकत्र येऊन पाकिस्तानी अण्वस्त्रसज्जतेवर अंकुश ठेवण्याची गरज आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात करण्यात आलेल्या सूचना
* अमेरिका आणि युरोपीय महासंघाने दहशतवादविरोधी मुद्दय़ांवर आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्ट कराव्यात
* पाकिस्तानबाबत दोहोंचेही निश्चित आणि ‘डोळस’ धोरण असावे
* पाकिस्तानात कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी अन्य नागरी पर्यायांचा विचार व्हावा
* पाकिस्तानातील न्यायव्यवस्था, संसदीय कार्यपद्धती, शिक्षणप्रणाली आणि प्रसारमाध्यमे यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे