Makkah Al-Mukarramah Summit for Joint Defence: मध्यपूर्वेत सुरु असलेले युद्ध आणि सुरक्षेच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन देशांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या या ऐतिहासिक कराराद्वारे तिन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होणार आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कराराची माहिती
करारातील अत्यंत महत्त्वाच्या अटीनुसार, या तीन देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवरील संयुक्त हल्ला मानला जाईल. “कोणतेही संभाव्य आक्रमण रोखणे आणि लष्करी ताकद वाढवणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय, तिन्ही देशांमधील सर्व स्तरांवरील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल,” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
सौदी अरेबियात झाला करार
सौदी अरेबियात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे अध्यक्ष रजब तैय्यब एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी झाली. पंतप्रधान शेहबाज शरीफ हे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासह तीन दिवसांच्या सौदी दौऱ्यावर आले आहेत.
करारात तुर्कीचा समावेश
इराण आणि त्याच्या प्रादेशिक मित्रगटांकडून होणारे ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले पाहता, सौदी अरेबियाने आपल्या संरक्षण भागीदारांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारात आता अणुवस्त्रधारी पाकिस्तानबरोबरच ‘नाटो’ या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्यबळ आणि प्रगत संरक्षण क्षमता असलेल्या तुर्कीचा समावेश आहे.
तिन्ही देशांची लष्करी ताकद वाढणार
तुर्कीच्या ‘हाबरतुर्क’ वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या करारामुळे संयुक्त लष्करी सराव, लष्करी प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण सुकर होणार आहे. याआधी सप्टेंबर महिन्यातही पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एकमेकांवरील हल्ला हा संयुक्त हल्ला मानण्याचा द्विपक्षीय करार केला होता. आता तुर्कीचा यात समावेश झाल्याने तिन्ही देशांची लष्करी व धोरणात्मक ताकद वाढणार आहे.
