लंडन, कराची : नोबेल विजेती पाकिस्तानी महिला शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिचा विवाह पाकिस्तान क्रिकेट मंडळातील एका अधिकाऱ्याशी छोटेखानी समारंभात पार पडला आहे.

युसूफझाई हिने तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली असतानाही पाकिस्तानातील शाळेत शिक्षण घेतले होते. ट्विटरवर विवाहाची घोषणा करताना २४ वर्षीय मलालाने  तिचा पती असेर मलिक व इतर कुटुंबीयांचे छायाचित्र टाकले आहे.

मलालाने गुलाबी रंगासारखा सूट घातला होता व साधे दागिने वापरले होते. बर्मिंगहॅम येथे मलिक यांच्याशी विवाहाच्या कार्यक्रमाची छायाचित्रेही तिने टाकली आहेत. मलिक हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे महाव्यवस्थापक आहेत. मलालाने म्हटले आहे,की आजचा दिवस माझ्या आयुष्यात महत्त्वाचा आहे, असेर व मी विवाहबंधनात अडकलो असून आता एकमेकांचे जीवन साथीदार बनलो आहोत.

बर्मिंगहॅम येथील घरात निकाह झाला तेव्हा कुटुंबीय उपस्थित होते. आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे. मलाला व असेर यांची भेट दोन वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. नंतर त्यांच्यात मैत्री झाली व नंतर त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने विवाहाचा निर्णय घेतला. मलिक हे पाकिस्तान क्रिकेट मंडळातील अधिकारी असून मंडळाच्या लाहोर येथील कार्यालयात त्यांनी कामास सुरुवात केली तेव्हा ते व्यवस्थापक होते नंतर महाव्यवस्थापक झाले. आपण विवाह करू की नाही हे सांगता येणार नाही असे मलालाने व्होग नियतकालिकाला सांगितले होते, त्यामुळे खळबळ उडाली होती. लोक विवाह का करतात हेच मला समजत नाही असे तिने त्या वेळी म्हटले होते. जर तुमच्या आयुष्यात कुणी यावे असे वाटत असेल तर विवाहाचा सोपस्कार गरजेचा नाही असेही तिने त्या वेळी सांगितले होते.