BRICS Summit 2026 : दिल्लीत १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ पार पडली आहे. या ‘ब्रिक्स’ परिषदेत अनेक राष्ट्रांचे प्रमुख सहभागी झाले होते. या परिषदेत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे देखील सहभागी झाले होते. दरम्यान, अन्वर इब्राहिम हे आता केरळला भेट देणार आहेत. केरळच्या दौऱ्यादरम्यान अन्वर इब्राहिम हे इस्लामिक अभ्यासक कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीआधी अन्वर इब्राहिम यांनी कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोठं भाष्य केलं आहे.

‘महिलांनी पुरुषांसोबत सार्वजनिक व्यासपीठांवर उपस्थित राहू नये. महिलांनी घराच्या चार भिंतींतच राहावं’, असं वादग्रस्त वक्तव्य कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर आता पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे मुसलियार यांची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

दरम्यान, अन्वर इब्राहिम यांनी आपण ए.पी.अबूबकर मुसलियार यांच्या सर्व मतांशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच मलेशियामध्ये महिलांना समान अधिकार आहेत, असंही अन्वर इब्राहिम यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

पंतप्रधान अन्वर इब्राहिम काय म्हणाले?

“कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार हे एक इस्लामिक अभ्यासक आहेत. धार्मिक ग्रंथ (कुराण), परंपरा आणि इस्लामिक अभ्यासात त्यांचं योगदान आहे. मात्र, त्यांच्या सर्व मतांशी आम्ही सहमत असूच असं नाहीये. मलेशियामध्ये महिलांना समान अधिकार आहेत. आमच्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थींनीची संख्या अधिक आहे. माझी पत्नी डॉक्टर आहे. माझ्या सर्व मुलांना-मुलींसह शिक्षणाच्या पूर्ण संधी आणि स्वातंत्र्य दिलं गेलं आहे”, असं पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी म्हटलं आहे.

कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी काय म्हटलं होतं?

केरळमधील प्रमुख इस्लामिक विद्वानांच्या एका गटाने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना केलेल्या एका आवाहनावरून वाद निर्माण झाला होता. ‘समस्त केरळ जमिय्यतुल उलामा’च्या कांथापुरम गटाने काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त परिपत्रक जारी करत महिलांनी पुरुषांसोबत सार्वजनिक व्यासपीठांवर उपस्थित राहू नये, असं आवाहन केलं होतं. यावरून वाद निर्माण झाला होता.

या वादानंतर इस्लामिक अभ्यासक कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार यांनी त्या आवाहनाचं समर्थन केलं होतं. महिलांनी घरापुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे. त्यांना सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने अनर्थ ओढावतो. त्यामुळे इस्लाममध्ये स्त्रियांसाठी ‘हिजाब’ पद्धत असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. ते म्हणाले होते की, “महिलांना सार्वजनिक व्यासपीठांवर आणल्याने मोठा विनाश ओढवतो, हे ओळखूनच इस्लामने महिलांसाठी ‘हिजाब’पद्धत अनिवार्य केली. तसेच पवित्र कुराणही हेच सांगतं की, महिलांनी घरातच राहावं आणि सार्वजनिक ठिकाणी येऊ नये”, असं मुसलियार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, कांथापुरम ए.पी.अबूबकर मुसलियार हे भारतातील एक प्रभावशाली इस्लामिक विद्वान, सुफी विचारवंत आणि भारताचे वर्तमान ग्रँड मुफ्ती आहेत. त्यांना प्रामुख्याने केरळमधील सुन्नी मुस्लिम समुदायाचे प्रमुख नेते म्हणून ओळखलं जातं. तसेच ते ‘समस्त केरळ जमिय्यतुल उलामा’च्या कांथापुरम गटाचं नेतृत्व करतात.