Malaysia PM Pakistan question dodged : मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी गाझामधील इस्रायलच्या कारवाईला राज्य पुरस्कृत दहशतवाद (state terrorism) म्हटलं आहे, परंतु पाकिस्तानच्या बाबतीत हाच निकष लावण्यास आणि भारताच्या या शेजारी देशाला दहशतवादाचा राज्य पुरस्कृत प्रायोजक म्हणण्यास त्यांनी नकार दिला आहे. ‘एनडीटीव्ही’ ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
इब्राहिम यांनी गाझामधील हमासविरुद्धच्या इस्रायली कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला, परंतु भारताच्या विरोधातील पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाचा उल्लेख आला तेव्हा मात्र त्यांच्याकडे शब्दांची कमतरता जाणवली. ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेसाठी भारतात आलेले इब्राहिम यांनी, इस्रायलकडून पॅलेस्टाईनचे जे काही चालले आहे ते त्यांनी वसाहतीकरण संबोधत ते थांबवण्याची मागणी केली. “हमास संघटना फक्त २० वर्षे जुनी आहे. परंतु पॅलेस्टाईनचे वसाहतीकरण ७० वर्षे जुने आहे. आम्हाला मलेशिया आणि भारतात वसाहतीकरणाचा अनुभव आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाईनचे होत असलेले वसाहतीकरण आम्ही सहन करू शकत नाही”, असं इब्राहिम यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.
“सतत होणारे बॉम्बस्फोट आणि हत्या अत्यंत क्रूर आहेत. गाझामधील इस्रायलची कृती म्हणजे राज्य पुरस्कृत दहशतवाद आहे”, अशी घोषणा त्यांनी केली. परंतु, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, पाकिस्तानने गेल्या वर्षी पहलगाममध्ये जे काही केले, त्यालाही ते ‘राज्य पुरस्कृत दहशतवाद’ म्हणणार का? तेव्हा इब्राहिम यांनी तसं करण्यास नकार दिला. “मी इतक्या टोकापर्यंत जाणार नाही. मला माहित आहे की भारतात हे बोलणं अत्यंत संवेदनशील आहे. मी मोदीजींचा जवळचा मित्र आहे आणि आम्ही पाकिस्तानी लोकांशीही संवाद ठेवतो”, असं इब्राहिम यांनी भारताच्या विरोधात पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे म्हणण्यास नकार देताना सांगितलं.
भारतात हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची तथ्ये आणि आकडेवारी समोर ठेवून जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा इब्राहिम यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांच्या कोणत्याही गुप्तचर यंत्रणेने या दहशतवादी कारवाया पाकिस्तानच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचं निश्चित केलेलं नाही. तसेच, ‘दहशतवादी कृत्य झालंच नाही’ असं आपलं म्हणणं नाही, असंही त्यांनी जोडलं.
