अफगाणीस्तानमध्ये दूरचित्रवाहिन्यांवरील महिला वृत्तनिवेदिकांना प्रक्षेपणादरम्यान चेहऱ्या झाकण्यास अनिवार्य केल्यानंतर जगभरात तालिबान सरकारवर टीका केली जात आहे. या आदेशाची काही वृत्तवाहिन्यांनी अंमलबजावणी सुरु केली आहे. तर काही वृत्तनिवेदिकांनी त्याला विरोध दर्शविला आहे. अशात आता अफगाणिस्तानमधील काही पुरुष वृत्तनिवेदक सरकारच्या या आदेशाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काही पुरुष वृत्तनिवेदकांनी बातम्यांच्या प्रक्षेपणआदरम्यान तोंडाला मास्क लावून तालिबान सरकारच्या या आदेशाल विरोध दर्शविला आहे. त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा >> चिनी व्हिसा प्रकरण; सीबीआयनंतर आता कार्ती चिदंबरम यांच्यावर ईडीकडूनही गुन्हा दाखल

अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान त्यांचा चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला. काही वृत्तवाहिन्यांनी या आदेशाची रविवारपासून (२२ मे) अंमलबजावणी सुरु केली. काही महिला वृत्तनिवेदिकांनी याला जाहीर विरोध केला आहे. काही निवेदिकांचे चेहरा झाकेलेले फोटो समोर आले आहेत. त्यानंतर आता सोशल मीडियावर #FreeHerFace नावाची चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीमध्ये काही पुरुषांचाही सहभाग असून त्यांनी चेहरा झाकण्याच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. अफगाणीस्तानमधील टोलो न्यूजच्या पुरुष वृत्तनिवेदकांनीही चेहऱ्याला मास्क लावत तालिबान सरकारच्या या आदेशाला विरोध केला.

हेही वाचा >> ‘वंदे मातरम्’ला जन गण मनसारखा समान दर्जा द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिका

चेहरा झाकल्यामुळे श्वास घेता येत नाही

तालिबान सरकारच्या या आदेशामुळे महिला वृत्तनिवेदिकांना बातम्या सांगताना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत एका वृत्तनिवेदिकेने सविस्तर सांगितले आहे. “मला श्वास घेता येत नाही. मला पूर्ण ऑक्सिजनही मिळत नाही. आम्हाला शब्द अचूक पद्धतीने उच्चारणे गरजेचे असते. मात्र मास्क आणि चेहरा झाकलेला असल्यामुळे आम्हाला बातमी वाचण्यास खूप उडचणी येतात,” असं ही महिला वृत्तनिवेदिका म्हणाली.

हेही वाचा >> काँग्रेसचा राजीनामा देताच कपिल सिब्बल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोदी सरकार…”

दरम्यान, तालिबानमधील पुरुष वृत्तनिवेदकांनी महिला वृत्तनिवेदिकांची बाजू घेत चेहरा झाकण्याच्या आदेशाला विरोध केल्यामुळे पुरुषांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. महिला वृत्तनिवेदिकांनीही याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे.