पीटीआय, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मदतनीस बिभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी मंगळवारी ‘इंडिया आघाडी’च्या नेत्यांकडे वेळ मागितली. मालिवाल यांनी राहुल गांधी आणि शरद पवार आदी इंडिया आघाडीच्या नेत्यांना हे पत्र लिहिले आहे.

मला मारहाण झाली, याबाबत जाहीरपणे बोलल्यानंतर मलाच दोषी ठरवले जाऊ लागले. मला पाठिंबा देण्याऐवजी माझ्या पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्याविरोधात मोहीम राबवल्याचे मालिवाल यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या महिनाभरात या प्रकाराने मला प्रचंड त्रास झाला. न्यायाची मागणी करताना मी एकटी पडली आहे. यावर चर्चा करण्यासाठीच मला तुमची वेळ हवी आहे, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.

हेही वाचा >>>वाराणसीत मोदींची मोठी घोषणा; पीएम किसान योजनेचे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

महिला आयोगात असताना गेल्या ९ वर्षांत मी १.७ लाखाहून अधिक प्रकरणे हाताळली आहेत. हे करताना मी कोणालाही घाबरली नाही. महिला आयोगाला एका उंचीवर नेले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मला मारहाण केल्यानंतर माझे चारित्र्य हनन केले जाते, ही शरमेची बाब असल्याचे मालिवाल यांनी म्हटले आहे.