नवी दिल्ली : नरेंद्र मोदी, अमित शहा सातत्याने पंडित नेहरूंवर टीका करतात, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. ‘वंदे मातरम’ची पहिली दोन कडवी स्वीकरण्याची निर्णय एकट्या नेहरूंचा नव्हता. पण, मोदी पूर्ण सत्य सांगत नाहीत. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी वंदे मातरमवरील चर्चेत बोलताना घेतली.
“आम्ही नेहमीच ‘वंदे मातरम’ गात आलो आहोत. पण, ज्यांनी ‘वंदे मातरम’ गायले नाही, त्यांनी आता ते गाणे गायला सुरू केले आहे. ही ‘वंदे मातरम’ची शक्ती आहे. हा एक राष्ट्रीय उत्सव आहे, हा चर्चेचा विषय नव्हे,” असे खरगे म्हणाले. लोकसभेतील प्रियंका गांधी-वढेरा यांच्या भाषणाचे खरगेंनी समर्थन केले. ‘वंदे मातरम’वर कितीही चर्चा केली तरी लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्नापासून तुम्हाला पळ काढता येणार नाही, असेही खरगे म्हणाले.
खरगे म्हणाले, “१९२१ मध्ये असहकार चळवळ सुरू झाली, तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते ‘वंदे मातरम’चा जयजयकार करत तुरुंगात जात होते. तेव्हा तुम्ही काय करत होता? तुम्ही ब्रिटिशांसाठी काम करत होता. तुम्ही संविधानाला, तिरंग्याला विरोध केला. रामलीला मैदानावर संविधानाची प्रत कोणी जाळली होती? तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवत आहात? तुम्ही देशभक्तीला घाबरत होता, ब्रिटिशांची चाकरी करत होतात,” अशी टीका खरगेंनी केली.
पंतप्रधान मोदी जवाहरलाल नेहरूंचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत, ना गृहमंत्री शहा. ‘वंदे मातरम’ची कडवी वगळल्याचा दोष मोदींनी नेहरूंना दोष दिला. पण, हा निर्णय नेहरूंनी एकट्याने घेतलेला नाही. काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव संमत करताना बैठकीत महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मदन मोहन मालवीय, आचार्य जे. बी. कृपलानी देखील उपस्थित होते. इतर कडवी वगळण्यात अडचण नसल्याचे मत टागोरांनीही व्यक्त केले होते. असे असताना नेहरूंना का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल खरगेंनी केला.
मोदी, शहांनी नेहरूंवर केलेला मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप चुकीचा आहे. बंगालमध्ये मुस्लिम लीगशी युती करून सरकार स्थापन करणारे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी होते, नेहरू नव्हते. – मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
