Mallikarjun Kharge Demands Voting on Ballot Paper : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया व ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात बुधवारी (९ एप्रिल) मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “जगभरातील अनेक विकसित देशांनी मतदानासाठी ईव्हीएम हटवून त्याजागी मतपत्रिकेचा स्वीकार केला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण आहोत जे आजही ईव्हीएमवर अवलंबून आहोत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या वैयक्तिक लाभांसाठी अजूनही ईव्हीएम वापरत आहे आणि ईव्हीएमचाच प्रचार करत आहे.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “गेल्या ११ वर्षांपासून हे सरकार सत्तेत आहे. परंतु, आजवर विरोधी पक्षांमधील कोणत्याही नेत्याला सभागृहात त्याचं व जनतेचं म्हणणं मांडता आलेलं नाही. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे.”

“विकसित देश मतपत्रिकेवर परतले”

ईव्हीएमवरून केंद्र सरकारवर टीका करत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “जगभरातील बहुसंख्य देश, विकसित देश मतदानासाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करत आहेत. अनेक देश मतपत्रिकेवर परतत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण आजही ईव्हीएमचाच वापर करत आहोत.”

येत्या काळात देशातील तरुण रस्त्यावर उतरतील : खरगे

खरगे म्हणाले, “ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. परंतु, विद्यमान सरकार त्यावर कुठल्याही प्रकारची पावलं उचलताना दिसत नाही. उलट निवडणुकीत केवळ त्यांनाच फायदा होईल अशा एकेक कल्पना या सरकारने शोधून काढल्या आहेत. परंतु, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की येत्या काळात या देशातील तरुण रस्त्यावर उतरतील आण ईव्हीएम नको म्हणतील.”

मल्लिकार्जुन खरगेंची मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या लोकांनी (भाजपाप्रणित एनडीए) जनतेची मोठी फसवणूक केली आहे. घोटाळा करून या लोकांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे मी आगामी काळात देशात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करतो”, असं खरगे म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, “हे सरकार जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू देत नाही. विरोधी खासदारांना बोलू देत नाही. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधींना देखील बोलू देत नाही. त लोक जनतेला कसं काय बोलू देतील? त्यामुळे यावर तुम्हा सर्वांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. लढाई लढावी लागेल.”