पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रातील मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. तसेच काँग्रेसने तरुणांसाठी सर्वंकष ‘शिक्षण ते रोजगार पथदर्शी आराखडा’ तयार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील इंदिरा भवन या काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
बैठकीची सुरुवात करताना खरगे यांनी राम मंदिरातील देणग्यांच्या अपहाराचा मुद्दाही उपस्थित केला. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी आणि जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी खरगे यांनी केली.
शैक्षणिक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या ताब्यात जात आहेत, असा आरोपही खरगेंनी केला. ते म्हणाले, “शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तरुण नोकऱ्यांच्या शोधात बाहेर पडतात तेव्हा त्यांना प्रश्नपत्रिका फुटणे, भरती परीक्षांमधील घोटाळे आणि नियुक्त्यांना विलंब अशा संकटांचा सामना करावा लागतो. गरीब आणि वंचित पार्श्वभूमीच्या मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतो.” देशभरातील तरुणांमध्ये वाढलेला संताप हा अचानक किंवा एका दिवसात निर्माण झालेला नाही. सरकारने त्यांचे ऐकून घेण्याऐवजी समस्या दूर लोटण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या, अशी टीका त्यांनी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी जंतर-मंतरवरील आंदोलनावरून सरकारला प्रश्न विचारले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत न येता प्रश्नांचे उत्तर देणे टाळले, याची आठवण खरगे यांनी करून दिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनिया, मुकुल वासनिक आणि पी. चिदंबरम बैठकीला उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील मुद्दे
– जनतेमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी राम मंदिराचा वापर करणाऱ्यांचा मुखवटा आता पूर्णपणे फाटला आहे
– प्रश्नपत्रिका फुटीचे मुद्दे तळागाळापर्यंत नेण्याचा निर्धार
– राम मंदिर देणग्या अपहाराच्या मुद्द्यावर देशभर निर्धार करण्याचे प्रदेश काँग्रेस समित्यांना निर्देश
– संसदेचे पावसाळी अधिवेशन विरोधकांसाठी १०० टक्के यशस्वी ठरले, प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर सरकार बचावात्मक स्थितीत होते यावर बैठकीत एकमत
– उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील ‘शुद्धीकरणा’च्या प्रसंगाचा निषेध
– शैक्षणिक व्यवस्थेत फलदायी बदलांसाठी एका महिन्याच्या आत योजना आखण्याचे काँग्रेस मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले
– देशभरातील ८०० लहान-मोठ्या शहरांमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम; काही कार्यक्रमांना राहुल गांधी उपस्थित राहणार
– लोकसभेचे संख्याबळ पुढील २५ वर्षे ५४३वर स्थिर ठेवण्याची मागणी
– सध्याच्या लोकसभा संख्याबळाच्या आधारे महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागांची मागणी
गेल्या १२ वर्षांमध्ये मोदी सरकारने युवकांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. नव्या शाळा सुरू करण्याऐवजी अलीकडील वर्षांमध्ये ९४ हजार शाळा बंद करण्यात आल्या आहेत. खासगीकरणाच्या शर्यतीत उच्च शिक्षण वाढत्या प्रमाणात महाग होत आहे आणि सामान्य कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.-मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
