नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘दहशतवादी’ म्हटल्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी नोटीस बजावली. २४ तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेशही आयोगाने खरगे यांना काढले. यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेऊन खरगेंविरोधात लेखी तक्रार नोंदवली होती.

भाजपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. खरगेंच्या टिप्पणीमुळे आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत. आम्ही आमची संतप्त प्रतिक्रिया आयोगासमोर मांडली. खरगे यांनी ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींचा अवमान केला, तो सहन करता येणार नाही. म्हणूनच आम्ही आयोगाच्या मुख्यालयात जाऊन तक्रार नोंदवली.

पंतप्रधानांना ‘दहशतवादी’ म्हणणे हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. भाजपच्या शिष्टमंडळात रिजिजू यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, अर्जुराम मेघवाल आदींचा समावेश होता. खरगेंच्या या टिप्पणीवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला असून खरगेंवर कारवाई करण्याची मागणी केली. तामीळनाडूचे भाजपचे निवडणूक प्रभारी पीयूष गोयल यांनी खरगे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

खरगेंचे विधान काय?

तमिळनाडूमध्ये निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी खरगे यांनी चेन्नईमध्ये ही टिप्पणी केली. पेरियार, डॉ. आंबेडकर, अण्णादुराई, कमलराज आणि कळैग्नार या व्यक्तींनी महिला आरक्षण, न्याय, समानता आणि बंधुभाव या तत्त्वांचा पुरस्कार केला. मोदी या तत्त्वांचे पुरस्कर्ते नाहीत. मग, अण्णाद्रमुक पक्ष मोदींशी हातमिळवणी कशी करू शकतो? मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा समानतेवर विश्वास नाही. त्यांचा पक्षही समानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही, असे खरगे म्हणाले होते.

मोदी ईडी, आयटी यासारख्या केंद्रीय संस्था व यंत्रणांचा विरोधकांना धमक्या देण्यासाठी वापर करतात. या सर्व संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. आता तर लोकसभेच्या मतदारसंघांची फेररचनाही त्यांनी आपल्या हाती घेतली आहे. त्या संदर्भात मी टिप्पणाी केली होती. मी असे म्हटले होते की, मोदी लोकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. मी त्यांना ‘दहशतवादी’ असे कधीच म्हटले नव्हते. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस