नवी दिल्ली : ‘‘गेल्या महिन्यात उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील माझ्या कार्यक्रमानंतर करण्यात आलेले ‘व्यासपीठ शुद्धीकरण’ हे अस्पृश्यतेचे कृत्य होते. या घटनेता सहभागी असलेल्यांवर तात्काळ ‘एफआयआर’ दाखल करण्याचे निर्देश उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना द्यावेत,’’ अशी विनंती काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे नेते जे. पी. नड्डा यांना पत्राद्वारे केली.
‘‘जेव्हा राज्यसभेत ‘शुद्धीकरणाचा’ मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की चौकशीनंतर दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल,’’ अशी आठवण खरगे यांनी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात करून दिली. या घटनेला २४ दिवस उलटूनही हल्द्वानी येथील घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या संघटना आणि व्यक्तींवर एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आलेला नाही, याबद्दल खरगे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘‘या घटनेतील सर्वात आक्षेपार्ह बाब म्हणजे ज्या रामलीला मैदानावर मी सभेला संबोधित केले होते, तेथे भारतीय संविधान आणि मानवी मूल्यांच्या भावनेविरुद्ध शुद्धीकरण करण्यात आले. हे शुद्धीकरण थेट अस्पृश्यतेशी जोडलेले असल्याचे दिसते,’’ असे खरगे यांनी पत्रात नमूद केले. उत्तराखंडमधील कथित घटनेनंतर काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी दलितविरोधी अत्याचार कायद्याअंतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणीही राहुल यांनी केली होती.
