कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला फक्त काही तासांचा अवधी उरलेला असताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी मुख्यमंत्रीपदासंबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असले तरी सत्ता आल्यानंतर समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पक्षाने दलित व्यक्तिला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली तर आपल्याला काहीही आक्षेप असणार नाही असे मत रविवारी सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले होते. त्यावर सोमवारी खर्गे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले कि, आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी हा विषय निर्माण केला आहे. मुख्यमंत्रीपदासंबंधी हायकमांडचा निर्णय अंतिम असेल. मतमोजणीला आता फक्त १२ तास उरले आहेत.

मी फक्त दलित आहे म्हणून पक्षाकडून मला मुख्यमंत्री किंवा अन्य कुठले पद दिले जाणार असेल तर ते मला अजिबात आवडणार नाही असे खर्गे यांनी स्पष्ट केले. आपली ज्येष्ठता लक्षात घेऊन पदासाठी विचार होणार असेल तर आपल्याला नक्कीच आनंद होईल असे खर्गे म्हणाले.

हायकमांडने दलित मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला तर माझे त्याला समर्थन असेल. मी कोणाच्याही विरोधात नाही. पण आमदारांचे मत सुद्धा विचारात घेतले जाईल. कोणीही निर्णय लादू शकत नाही. जबरदस्तीने कोणालाही मुख्यमंत्री बनवणे कठिण आहे. तुम्ही अशा प्रकारे सरकार चालवू शकत नाही असे सिद्धरामय्या रविवारी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.