लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षणाचा मुद्दा पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमधील निवडणूक प्रचारात सोमवारीही केंद्रस्थानी राहिला. “महिलांना २०२९पासून एक तृतियांश आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयकाची हत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, विरोधक केवळ मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या विरोधात होते,” अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगालमधील प्रचारसभांमध्ये केली.

‘विरोधकांनी संसदेत महिला आरक्षणाची भ्रूणहत्या केली,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली होती. त्याला खरगे यांनी सोमवारी कूचबिहार आणि सिलिगुडी येथील प्रचारसभांमध्ये प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये इतका प्रचार करत आहेत, त्यांना या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला. बंगालमध्ये प्रचार करताना मोदी आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष करत आहेत, असे खरगे म्हणाले.

तमिळनाडूमध्ये रालोआच्या नेत्यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. “द्रमुक आणि काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक पराभूत केल्याबद्दल माफी मागावी,” अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी कोईम्बतूर येथे प्रचारसभेत बोलताना केली. काँग्रेस आणि द्रमुकने नेहमीच सुधारणांना विरोध केला आहे, अशी टीका नायडू यांनी केली. महिला आरक्षण विधेयक सादर करणे हा देशातील सर्वात प्रगतशील निर्णयांपैकी एक होता, असा दावाही त्यांनी केला.