नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलेलं आहे. यावरून लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांत अनेकदा दोन्ही सभागृहाचं कामकाज गदारोळामुळे स्थगित करावं लागलं.

मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईवरून मल्लिकार्जुन खरगे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ‘पंतप्रधान मोदींनी चूक मान्य करून माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर अमित शाह यांनी सभागृहात निवेदन सादर करावं’, अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

“राज्यसभेच्या खासदारांनी आज (६ ऑगस्ट) अध्यक्षांची भेट घेऊन मागणी केली आहे की, पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन सादर करावं. त्यामुळे त्यांना सभागृहात बोलवावं. जगाच्या दुसऱ्या एखाद्या ठिकाणी काय चाललंय? याचं उत्तर आम्ही मागत नाहीत”, असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर टीका केली.

“आम्ही विशेषतः पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबाबत विचारणा करत आहोत. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे सभागृहात येण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांचं आंदोलन मागे घेण्यास सांगायचं असतं तर सरकार तसं आवाहन करू शकलं असतं. पण तसं करण्यात आलं नाही. त्यामुळे यावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन सादर करावं अशी सर्वांची मागणी आहे असं आम्ही केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांना कळवलं आहे”, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे.

“विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, कथित पेलेट गन्स अशा गोष्टींचा वापर विद्यार्थ्यांच्या विरोधात कधीही केला जाऊ नये, पण सरकारने हा वापर केला. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी कोणताही उपद्रव केला नव्हता. सरकारी वाहनांचं नुकसान झालं नव्हतं. एखाद्या लोकप्रतिनिधीला अडवलं होतं का? नाही. मात्र, तरीही विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ती चुकीची होती”, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

“लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, याचा खुलासा अमित शाह यांनी सभागृहात करावा. पेलेट गन्सचा वापर करण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती का? अश्रूधुराचा वापर पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता का? अनेक तरुण, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मारहाण का करण्यात आली? याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. संसदेचं अधिवेशन सुरू होऊन १५ दिवस झाले, तरीही पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नाहीत आणि केंद्रीय गृहमंत्री उपस्थित नाहीत. त्यामुळे याचे दोन अर्थ निघतात. एक तर तुम्ही सभागृहाला जुमानत नाही किंवा तुम्ही घाबरलेले आहात”, अशा शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर टीका केली.