संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब झाली आहे. त्यामुळे आज अमित शाह यांचं जे भाषण होणार होतं ते होण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. दुसरीकडे राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंनी त्यांच्या भाषणानंतर शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्यावर जे. पी. नड्डांनी उत्तर दिलं आहे.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

मला अत्यंत दुःखाने सांगावं लागतं आहे की मी हल्द्वानी या ठिकाणी रामलीला मैदानात भाषण केलं. तिथे लाखो लोक होते. मी कुठल्याही समाजाचं, धर्माचं नाव घेतलं नाही. मी लोकांच्या समस्या सांगितल्या. पण बुधवारी त्या ठिकाणी भाजपाच्या लोकांनी स्टेजवर जाऊन हवन केलं आणि शुद्धीकरण केलं. ही बाब अतिशय खेदाची आहे. ही लोकशाही आहे का? असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी उपस्थित केला.

जे. पी. नड्डा नेमकं काय म्हणाले?

जे. पी. नड्डा म्हणाले की मल्लिकार्जुन खरगेंनी जो मुद्दा मांडला तो वेदनादायी आहे. तो फक्त काँग्रेससाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. भाजपाचे लोक होते असं सांगितलं गेलं. मात्र भाजपा अशा कुठल्या गोष्टी करत नाही. पण तुम्ही म्हटलं आहे तर आम्ही या प्रकरणी चौकशी करु. तसंच मी हे सांगू इच्छितो की शुद्धीकरण वगैरे गोष्टीसाठी भाजपा कधीही पुढाकार घेत नाही. मी राष्ट्रीय अध्यक्षांनाही सांगतो आहे की याची चौकशी करा. तुमच्या ज्या भावना दुखावल्या आहेत तो सगळ्यांसाठीच खेदाचा विषय आहे.

मल्लिकार्जुन खरगे पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले अस्पृश्य…

जे.पी. नड्डांच्या निवदेनानंतर मल्लिकार्जुन खरगे पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले मी आजपर्यंत कधीही कुठला सार्वजनिक मुद्दा संसदेत आणलेला नाही. माझ्या भाषणानंतर अनेकदा अनेक गोष्टी घडल्या आहेत. पण मी दलित आहे म्हणून माझी मदत करा अशी याचना मी केलेली नाही. मात्र या गोष्टीत घडलंय असं की मी गेल्यानंतर शुद्धीकरण करण्यात आलं. मी अस्पृश्य आहे असं मला भासवण्यात आलं. हे चुकीचं आहे भाजपाच्या लोकांनी हे केलं आहे असा आरोप खरगेंनी केला.

जे.पी. नड्डांनी पुन्हा दिलं उत्तर

यानंतर जे.पी. नड्डा पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले मी आधीच सांगितलं की अशा कुठल्याही गोष्टींना भाजपा थारा देत नाही. भाजपाचा त्याच्याशी संबंध नाही. तसंच जे काही घडलं ते खेदजनक आहे. तरीही तुम्ही वारंवार असं म्हणत आहात की तुम्ही असं केलं, असं म्हणणं योग्य नाही. जे घडलंय त्याची चौकशी करु आणि दोषींना कठोर शासन करु असं उत्तर जे. पी. नड्डांनी दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तराखंडच्या हल्द्वानी या ठिकाणी रामलीला मैदान आहे. या मैदानावर मल्लिकार्जुन खरगे हे आले होते आणि त्यांनी भाषणही केलं होतं. या भाषणानंतर हिंदू संघटनांनी स्टेजवर पूजा-पाठ करत त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं होतं. ज्यावरुन भाजपावर काँग्रेसने जोरदार टीका केली होती. भाजपाची संकुचित प्रवृत्ती यावरुन दिसून येते असं काँग्रेसने म्हटलं होतं. आता राज्यसभेत हा मुद्दा खरगेंनी उपस्थित केला. ज्यानंतर जे. पी. नड्डा यांनी या प्रकरणी चौकशी होईल असं आश्वासन दिलं आहे.