शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. सोमवारी पार्टीच्या वतीने संसद मार्च आंदोलनात आंदोलकांवर लाठीचार्ज करत, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. या घटनेचे लोकसभा आणि राज्यसभेत दुसऱ्या दिवशी देखील पडसाद उमटले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केला पण, सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केले.
आंदोलकांवर लाठीचार्जचे पडसाद संसदेत
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार (२० जुलै) पासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने संसद चलो मार्चची घोषणा केली. जंतर मंतरवरुन मोठ्या संख्येने देशाच्या विविध कोपऱ्यातून आलेले हजारो तरुणांनी या मार्चमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, पोलिसांनी विविध ठिकाणी मोठे बॅरिकेड्स उभारुन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मार्च केल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला तसेच, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी आंदोलक जखमी झाले असून, विरोधकांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.
खरगेंनी मुद्दा उपस्थित करताच कामकाज स्थगित
लोकसभा आणि राज्यसभेत दुसऱ्या दिवशी देखील याप्रकरणी आवाज उठविण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला. “काल एक दुर्दैवी घटना घडली. नीट पेपरफुटीप्रकरणी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. काही विद्यार्थी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे”, अशा शब्दात आक्रमक पद्धतीने खरगे यांनी मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, खरगेंनी मुद्दा उपस्थित करताच सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केले.
देशाची अराजकतेकडे – खरगे
“आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्यावर चर्चा व्हावी अशी आमची मागणी होती. यावर सभागृहात चर्चा व्हावी आणि गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. पण, आमचे तोंड बंद करण्यात आलेत”, असे खरगे याप्रकरणी कामकाज स्थगित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“लोकशाही संपविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ६० वर्षाच्या इतिहासात मी असा प्रकार पहिल्यांदाच पाहत आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला? विद्यार्थ्यांना मारहाण का झाली? यावर चर्चा तर व्हावी. देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, आम्हाला सोमवारी देखील तुरुंगासारखे बंद करुन ठेवण्यात आले”, असा आरोप खरगेंनी केला. “देश अराजकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा याला कंट्रोल करत आहेत”, असेही खरगे म्हणाले.
